On This Day Chris Broad Birthday: क्रिकेटमध्ये अनेक बाप-लेकांच्या जोड्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यात ब्रॉड हे पिता-पुत्रही आहेत. स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. त्याने अनेक विक्रम केले. त्याच्या नावावर कसोटीत ६०० हून अधिक विकेट्स आहेत. पण याच स्टुअर्टला क्रिकेटचं बाळकडू मिळालं होतं त्याच्या वडिलांकडून.
त्याचे वडील ख्रिस ब्रॉड हे सध्या आयसीसीचे सामनाधिकारी म्हणून ओळखले जातात. पण त्यांची खेळाडू म्हणूनही कारकिर्द शानदार राहिली होती. त्यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
इंग्लंडचे माजी सलामीवीर ख्रिस ब्रॉड यांचा जन्म २९ सप्टेंबर १९५७ रोजी नोले, ब्रिस्टल येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ब्रायन ख्रिस्टोफर ब्रॉड असे आहे. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ब्रोडना ऍस्टोओमालायटस या आजाराचा सामना करावा लागला. त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर होऊ लागला.
परंतु आजारावर मात करत त्यांनी १९७९ मध्ये ग्लुस्टरशायर संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सलामीवीर फलंदाज ख्रिस ब्रॉड यांनी एकूण ३४० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ग्लुस्टरशायर व्यतिरिक्त ब्रॉड नॉटिंहॅमशमायर आणि ऑरेंज फ्री स्टेट संघांकडून देखील प्रथम श्रेणी क्रिकेट खेळेले. त्यांनी ३४० सामन्यांमध्ये ३८.०७ च्या सरासरीने २१८९३ धावा केल्या आहेत. यात ५० शतके आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे.
ख्रिस ब्रॉड यांनी १९८४ मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध त्यांनी लॉर्ड्सवर आपला पहिला कसोटी सामना खेळला. ब्रॉड यांनी आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या सामन्यातील पहिल्या डावात त्यांनी ५५ धावांची अर्धशतकीय खेळी केली. परंतु दुसऱ्या डावात त्यांना शून्यावर माघारी जावे लागले. वेस्ट इंडिज फलंदाज जॉर्डन ग्रीनने या सामन्यात २१४ धावांची खेळी केली. ग्रीनच्या या द्विशतकीय खेळीच्या जोरावर विंडीजने ३४४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत सामन्यात बाजी मारली.
कसोटी क्रिकेटनंतर ब्रॉड यांनी १९८६ मध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळीही त्यांनी पदार्पण सामन्यात अर्धशतक झळकावले. त्यांनी पर्थ येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ७६ धावांची खेळी केली आणि हा सामना इंग्लंडने ३७ धावांनी जिंकला.१८८६-८७ दरम्यानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ब्रॉड यांनी विक्रम रचला. त्यांनी ॲशेसमध्ये सलग ३ शतके झळकावून जॅक होब आणि वॅली हॅमंड यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
मात्र, ब्रॉड यांच्या या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवासादरम्यान त्यांच्यावर संघातील उद्धट वागणुकीमुळे आणि खराब कामगिरीमुळे अनेक टीका झाल्या. १९८८ मध्ये त्यांनी ॲशेसमध्ये रागात असताना स्टंप तोडले होते, तर दुसऱ्या प्रसंगात त्यांनी बाद झाल्यावर तोंड वाकडे करत चिडवले होते. या उद्धट कृत्यांमुळे व खराब फॉर्ममुळे त्यांना संघातून वगळण्यात आले होते.
सततच्या खराब कामगिरीमुळे ब्रॉड यांनी १९८८ मध्ये वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा वन-डे सामना खेळला. या सामन्यामध्ये त्यांनी ३४ धावा केल्या, तर त्यांनी आपल्या कारकिर्दीतील ३४ वन-डे सामन्यांमध्ये ४०.०२ च्या सरासरीने एकूण १३६१ धावा केल्या.
वन-डे नंतर त्यांनी कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली. त्यांनी लॉर्डसवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला अंतिम कसोटी सामना खेळला. ज्यामध्ये दोन डावात त्यांनी १८ आणि २४ अशा धावा केल्या. त्यांनी आपल्या २५ कसोटी सामन्यांमध्ये ३९.५४ च्या सरासरीने १६६१ धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. १९९३ मध्ये ते आपल्या ग्लुस्टरशायर संघामध्ये परतले. परंतु १९९४ मध्ये झालेल्या दुखापतीनंतर त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटला देखील रामराम केला.
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्यांनी सामनाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००३ मध्ये त्यांनी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात प्रथमच सामनाधिकारी म्हणून काम केले. ख्रिस ब्रॉड यांनी १२३ कसोटी, ३६१ वन - डे आणि १३८ ट्वेंटी -२० सामन्यात सामनाधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांच्या सामनाधिकारी कारकिर्दीतील धक्कादायक अनुभव म्हणजे श्रीलंकेच्या पाकिस्तान दौऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यावेळी ब्रॉड हे अंपायरींग टीमचा भाग होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.