Pakistan vs Bangladesh 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रावळपिंडी येथे कसोटी सामना सुरू आहे. ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ अंतर्गत या मालिकेला महत्त्व आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद रिझवान १७१ धावांची दमदार फलंदाजी केली, परंतु रिझवान नाबाद असताना कर्णधार शॉ मसूदने पहिला डाव घोषित केला. त्यामुळे रिझवानला द्विशतक झळकावण्याची संधी मिळाली नाही आणि पॅव्हेलियनच्या दिशेने निघालेल्या रिझवानने बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या बाबर आझमकडे बॅट फेकली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानने पहिला डाव ६ बाद ४४८ धावांवर घोषित केला. या कसोटीत पाकिस्तानने ११४ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर सौद शकील आणि रिझवान यांच्यात पाचव्या विकेटसाठी २४० धावांची भागीदारी झाली. शकीलने २६१ चेंडूंत नऊ चौकारांसह १४१ धावा केल्या, तर रिझवानने २३९ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १७१ धावांची खेळी केली. पाकिस्तानचा कर्णधार मसूदने पहिला डाव घोषित करत रिझवानला मैदानातून परत बोलावले.
रिझवानने सीमारेषा ओलांडताच त्याने बॅट बाबर आझमच्या दिशेने फेकली आणि बाबरने ती बॅट पकडली. यावेळी रिझवान त्याला काही बोलला आणि दोन्ही खेळाडू हसताना दिसले.
पाकिस्तानच्या ४४८ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने ४८ षटकांत २ बाद १३४ धावा केल्या आहेत. सलामीवीर शदमन इस्लाम ५३ धावांवर खेळतोय, तर मोमिनूल हक ४५ धावांवर नाबाद आहे.