Pakistan vs Bangladsh Memes: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात रावळपिंडी येथे पहिली कसोटी आजपासून सुरू होणार होती. पण, दुपारचे २.३० वाजले तरी ही कसोटी अजूनही सुरू झालेली नाही. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला होता, परंतु पाऊस थांबून २ तास उलटले तरी मॅच सुरू झालेली नाही. मैदान अजूनही सुकवण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यात सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहे आणि त्यात मैदान सुकवण्यासाठी पाकिस्तानचे क्रिकेटपटू हातात बादली आणि स्पंज घेऊन काम करत असल्याचा दावा केला जात आहे. ग्राऊंडस्टाफ कमी असल्याने क्रिकेटपटू मदत करत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काल या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल चार वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, मोहम्मद अली आणि खुर्रम शहजाद यांचा समावेश आहे. मात्र असं असतानाच कोणताही प्रमुख फिरकीपटू संघात नाही. त्यामुळे अष्टपैलू सऊद शकिल आणि सलमान अली आगा फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.
पहिली कसोटी १०.३० वाजता सुरू होणार होती, परंतु पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. WTC गुणतालिकेत पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. पंचांनी काही वेळापूर्वी मैदानाची पाहणी केली आणि दुपारी २.३० वाजता सुरू होईल, असे सांगितले. पहिल्या दिवशी ४८ षटकांचा खेळ होणार असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा सामना रंगणार असल्याचे त्यांनी सांगितले. रावळपिंडी कसोटीवरून सध्या नेटिझन्स त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत.