Rohit Sharma IPL: इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. यासाठी आता फ्रँचायझींची तयारीही सुरु झाली आहे. बीसीसीआयची फ्रँचायझींबरोबर बैठकही झाली. त्यामुळे आता लवकरच याबाबत अपडेट मिळतील.
असं असतानाच क्रिकेट वर्तुळात आयपीएलच्या या लिलावाबाबत अनेक चर्चा होत आहेत. यामध्ये अशीही चर्चा आहे की कदाचीत मुंबई इंडियन्सचा ५ वेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहित शर्मा लिलावात उतरू शकतो.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सने २०१३ ते २०२३ पर्यंत नेतृत्व करताना ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. परंतु , मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ आधी गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेडिंगमधून पुन्हा संघात घेतले. इतकेच नाही, तर त्याच्याकडे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारीही सोपवली.