India vs New Zealand 1st Test Match: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्रने शानदार शतकी खेळी केली आहे. भारतीय वंशाचा असलेल्या रचिनचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला असून तो तिथेच लहानाचा मोठा झाला आहे.
मात्र असं असलं तरी त्याचं बंगळुरूशी खास नातंही आहे. त्याचं कुटुंब मूळचं बंगळुरूतील असून त्याचे वडील येथे राहत होते, पण नंतर ते कामाच्या निमित्ताने न्यूझीलंडला गेले. पण त्यांचे काही नातेवाईक अजूनही बंगळुरूमध्ये आहेत. रचिनचे आजी-आजोबाही बंगळुरूमध्ये राहतात. विशेष म्हणजे हा सामना पाहाण्यासाठी त्याचे कुटुंबिय देखील स्टेडियममध्ये हजर आहेत.
त्यामुळे रचिनसाठी भारताविरुद्ध बंगळुरूमध्ये कुटुंबियांच्या समोर केलेलं शतक खास ठरलं आहे. रचिनने बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) १२४ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले.