Ranji Trophy 2024-25: पहिल्या दोन लढतींत अवघ्या एका गुणाची कमाई करणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने मेघालय संघाविरुद्धच्या रणजी क्रिकेट करंडकातील अ गटातील लढतीत दुसऱ्या दिवसअखेरीस पाच बाद २६३ धावा फटकावल्या.
पहिलाच रणजी सामना खेळत असलेल्या हर्षल काटे याने नाबाद ११७ धावांची खेळी साकारत दिवस गाजवला. त्याने या खेळीमध्ये १६ चौकारांचा पाऊस पाडला. मेघालय संघाने पहिल्या डावात २७६ धावा केल्या असून आता महाराष्ट्राचा संघ फक्त १३ धावांनी पिछाडीवर आहे.
मेघालय संघाने आठ बाद २७४ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र त्यांचा डाव २७६ धावांवरच आटोपला. बालचंदर अनिरुद्धने १४२ धावांची खेळी साकारली. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीने ८८ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रजनीश गुरबानीने ४४ धावा देत तीन फलंदाज बाद केले.