Mumbai vs Odisha Ranji Trophy 2024-25: ओडिसाविरुद्धच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ६०२ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात उतरलेल्या ओडिसाला मुंबईने २८५ धावांवर गुंडाळले. ज्यामध्ये मुंबईचा फिरकीपटू शम्स मुलानीने महत्वाची भुमिका बजावली. शम्सने ओडिसाचा निम्मा संघ बाद केला. मुंबईने पहिल्या डावानंतर सामन्यात ३१७ धावांची तगडी आघाडी घेतली आणि दुसऱ्या डावासाठी ओडिसाला फॉलो ऑन दिला.
श्रेयस अय्यरच्या द्विशतकीय (२३३) व सिद्धेश लाडच्या दीडशतकी (१६९) खेळीच्या मदतीने मुंबईने पहिल्या डावात ४ बाद ६०२ धावा केल्या. ज्यामध्ये सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीने ९२ धावांचे योगदान दिले. सुर्यांश शेडेने ३६ चेंडूत ७९ धावांची नाबाद खेळी केली. सुर्यांशने या खेळीत ७ चौकार व ६ षटकार ठोकले.
ओडिसाची सुरुवात खराब झाली. ओडिसाने अवघ्या ३ धावांवर पहिला विकेट गमावला. सलामीवीर स्वस्तिक समल शून्यावर माघारी परतला. त्यानंतर अनुराग सारंगी व संदीप पटनाईकच्या जोडीने ओडिसाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱ्या विकेट्साठी १०७ धावांची शतकी भागीदारी केली. पुढे ३१ व्या षटकात हिमांशु सिंगने अनुराग सारंगीला बाद केले आणि त्यांची शतकी भागीदरी तुटली. त्यानंतर आलेले दोन फलंदाज शून्यावर मघारी परतले. पण दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत असलेल्या संदीप पटनाईकने आपली शतकी खेळी पुर्ण केली.
६८ व्या षटकात संदीप पटनाईकला शम्स मुलानीने १०२ धावांवर त्रिफळाचित केले आणि हाच डावाचा टर्निंग पॉईंट ठरला. या विकेटनंतर ओडिसाचा डाव घसरण्यास सुरूवात झाली. पुढे फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजांना फार मोठी धावसंख्या करता आलेली नाही. ओडिसाचा डाव मुंबईने २८५ धावांवर आटपला आणि पहिल्या डावानंतर सामन्यात ३१७ धावांनी आघाडी घेतली.