Haryana vs Uttar Pradesh: हरियाणा व उत्तर प्रदेशदरम्यान रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे. हरियाणाने पहिल्या डावात उभारलेल्या ४५३ धावांना प्रत्युत्तर देताना युवा कर्णधार आर्यन जुयालने शतक ठोकले व ११८ धावांवर नाबाद आहे. तर भारतीय फलंदाज रिंकू सिंगचे शतक ११ धावांनी हुकले. उत्तर प्रदेशने तिसऱ्या दिवसाअखेरीस ६ विकेट्स गमावत २६७ धावांचा टप्पा गाठला आहे.
हरियाणाने हिमांशु राणा आणि धीरू सिंग यांच्या शतकी खेळीच्या मदतीने पहिल्या डावात ४५३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात उतरलेल्या उत्तरप्रदेशच्या आर्यन जुयाल व स्वस्तिक चिकाराने सामन्याची सुरूवात सकारात्मक केली. परंतु ३१ धावांवर उत्तर प्रदेशला आपला पहिला विकेट गमवावा लागला. स्वस्तिक चिकारा २१ धावांवर परतला. त्यानंतर उत्तर प्रदेश संघाचे पाठोपाठ २ विकेट गेले. ३ बाद ४३ अशी उत्तर प्रदेश संघाची परिस्थिती होती.
५व्या क्रमांकावर रिंकू सिंग फलंदाजीसाठी आला आणि रिंकू-आर्यनच्या जोडीने सामन्यात गती पकडली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १६२ धावांची मोठी भागीदारी केली आणि उत्तर प्रदेश संघाची धावसंख्या २०० पार घेऊन गेले. पण, ४९व्या षटकात रिंकू झेलबाद झाला आणि त्याचे शतक ११ धावांनी हुकले. रिंकूने १० चौकार व व ३ षटकारांच्या मदतीने ८९ धावांचे योगदान दिले.
रिंकू बाद झाला आणि उत्तर प्रदेश संघाचा खेळ गडगडला. कर्णधार आर्यन जुयालने संघाची एक बाजू लावून धरली आहे. आर्यनने शतक पूर्ण करत ११८ धावांवर नाबाद आहे. उत्तर प्रदेशने आर्यन व रिंकूच्या खेळीच्या मदतीने तिसऱ्या दिवसाअंती २६७ धावा केल्या आहेत. तर हरियाणा सामन्यामध्ये १८६ धावांनी आघाडीवर आहे.