Ranji Trophy 2024 Starts from 11th October: भारतातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेट करंडकाला आजपासून (११ ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही मोसमात अर्ध्याहून अधिक मोसमात भारतातील प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती असणार आहे; मात्र श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना भारतीय क्रिकेट संघात पुन्हा प्रवेश करण्यासाठी रणजी करंडकात चमक दाखवावीच लागणार आहे.
श्रेयस अय्यर व ईशान किशन यांच्याकडून भारतातील स्थानिक क्रिकेटकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयकडून त्यांना करारातून वगळण्यात आले. आयपीएल लिलावामधून कोट्यवधी रकमेची कमाई केल्यानंतरही क्रिकेटपटूंना स्थानिक स्पर्धांना प्राधान्य द्यावे लागणार आहे, हे बीसीसीआयकडून खेळाडूंना स्पष्टपणे सांगण्यात आले.
श्रेयस अय्यरने २०१५च्या रणजी मोसमात १३२१ धावांचा पाऊस पाडला होता. या मोसमात मिळवलेल्या दमदार यशानंतर श्रेयस अय्यरसाठी भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे उघडे झाले होते.
अय्यरकडून त्याच्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल. निवड समितीही त्याच्या फलंदाजीकडे लक्ष ठेवून असेल. ईशान किशनकडे झारखंड संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याने नेतृत्वपदासाठीही होकार दर्शवला आहे. याचा अर्थ या स्पर्धेकडे तो गांभीर्याने बघत आहे.
भारतातील अव्वल १७ ते १८ खेळाडू ऑक्टोबर ते जानेवारी यादरम्यान कसोटी मालिकांमध्ये व्यस्त असणार आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी त्यांना रणजी करंडकात सहभागी होता येणार नाही. ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान आठ कसोटी सामने रंगणार आहेत. त्यानंतर १५ खेळाडू दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये व्यग्र असणार आहेत.
जवळपास १८ खेळाडू भारत अ संघामधून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये खेळणार आहेत. युवा आशियाई करंडकासाठी भारतीय संघात १५ खेळाडूंचा समावेश असणार आहे. देशातील जवळपास ६५ खेळाडू हे विविध स्पर्धांमध्ये खेळणार असल्यामुळे रणजी करंडकात त्यांना खेळता येणार नाही.
मुंबईच्या संघाने गत मोसमात रणजी विजेता होण्याचा मान संपादन केला होता. यंदाही त्यांच्याकडून विजेतेपदाला गवसणी घालण्याची अपेक्षा केली जात आहे. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर या स्टार मंडळींमुळे मुंबईचा संघ भक्कम आहे.
सर्फराझ खान देशासाठी खेळत असल्यामुळे तो मुंबई संघाकडून खेळताना दिसणार नाही. मुशीर खान कार अपघातात जखमी झाल्यामुळे तोही सुरुवातीच्या लढतींमध्ये खेळणार नाही. मुंबईचा संघ अ गटात असून सलामीला त्यांना बडोदे संघाशी दोन हात करावे लागणार आहेत.
महाराष्ट्राच्या संघासमोर अ गटातील सलामीच्या लढतीत जम्मू-काश्मीरचे आव्हान असणार आहे. महाराष्ट्राचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर आहे. त्याच्यासाठीही हा मोसम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येत आहे. त्यामुळे ऋतुराजला मोठी खेळी करावीच लागणार आहे.
एका माजी निवड समिती सदस्याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, फक्त धावा करून किंवा विकेट घेऊन भारतीय संघाचे दरवाजे उघडे होणार नाहीत. गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर धावा करणाऱ्या फलंदाजाकडे निवड समितीचे लक्ष असणार आहे.
तसेच, फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर चमक दाखवणाऱ्या गोलंदाजाला टीम इंडियात प्रवेश करता येणार आहे. अर्थात निवड समिती प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असेल, यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.