Ravi Shastri on Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे भारतीय संघ त्याच्या मार्गदर्शनाखाली आता कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, या मालिकेपूर्वी गंभीर प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी करेल, असा विश्वास माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
शास्त्री यांनी २०१७ ते २०२१ दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांनी म्हटलंय की गंभीरच्या नव्या कल्पना फायदेशीर ठरू शकतात.
शास्त्री यांनी आयसीसीशी बोलताना म्हटलंय की 'आपण गौतमला ओळखतो, तो विचार करणारा (no-nonsense) व्यक्ती आहे. त्याचे काही विचारही असतील. चांगली गोष्ट ही आहे की त्याला एक परिपक्व संघ मिळाला आहे. त्याला एक स्थिर संघ मिळाला आहे.'
'मला वाटतं की जरी तुम्हाला असं वाटलं की तुम्ही परिपक्व आहात, पण तरी तुम्हाला काही नवीन विचारांचाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे मला वाटते की हा रोमांचक कार्यकाळ असेल.'
शास्त्री पुढे म्हणाले, 'गंभीर अधुनिक काळातील आहे. त्याच्यासाठी नुकताच आयपीएल हंगामाही शानदार राहिला. त्याचं वय कमी आहे, तो नवे विचार घेऊन येईल. तो बऱ्याच खेळाडूंना ओळखतो, विशेषत: मर्यादीत षटकांमधील. त्यामुळे मला वाटतं तो रिफ्रेशिंग असेल.'
याशिवाय शास्त्री यांनी असंही म्हटलंय की गंभीर आता खेळाडूंना समजून घेऊन कसा पुढे जातो, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ते म्हणाले, 'प्रशिक्षक म्हणून प्लेअर्स मॅनेजमेंट खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्यामुळे तो कसा पुढे जातो, हे पाहाणे औत्सुक्याचे असणार आहे. मला वाटतं त्याच्याकडे यासाठी त्याच्या कल्पना असतील. त्याच्याकडे अनुभव आहे.'
'प्रश्न फक्त इतकाच आहे की तो किती लवकर खेळाडूंना समजून घेईल. खेळाडूंची ताकद काय किंवा त्यांचं व्यक्तीमत्त्व काय, त्यांचा स्वभाव कसा आहे? अशा अनेक गोष्टींचा विचार एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी करावा लागतो.'
गंभीरने यापूर्वी २०२२-२०२३ या दोन हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर म्हणून काम केले आहे. या दोन्ही हंगामात लखनौ प्लेऑफमध्ये पोहचले होते. तसेच २०२४ हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने विजेतेपदाला गवसणी घातली होती.
गंभीर भारताचा एक यशस्वी फलंदाजही असून त्याने खेळाडू म्हणून १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तो २००७ टी२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.