Rinku Singh Purchase New Home: भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएलमधील कोलकाता संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंगने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कुटुंबीयांना सुखाचा धक्का दिला. अलीगढमधील ओझोन सिटी येथील गोल्डन इस्टेटमध्ये रिंकूने आलिशान घर खरेदी केले. एक छोटेसे पत्र्याचे घर ते स्वत:चे आलिशान घर, रिंकू सिंगचा हा प्रवास प्रेरणादायी होता. बुधवारी संध्याकाळी रिंकू सिंगने आपल्या कुटुंबासह नवीन घरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय व शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
रिंकू सिंगचे नवीन घर ५०० स्क्वेअर यार्ड असून त्याच्या घराचा क्रमांक ३८ आहे. घराच्या चाव्या मिळाल्यानंतर सर्व सदस्यांनी मिळून घराची रिबीन कापली. यावेळी कुटुंबियांसोबतच मित्रांनीही नवीन घर घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.
३१ ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सने जाहीर केलेल्या संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रिंकू सिंगचाही समावेश आहे. गेल्या हंगामात केकेआरने (KKR) रिंकूला ५५ लाख रूपयात खरेदी केले होते. पण आता आयपीएलच्या नव्या रिटेंशन नियमांनुसार रिंकूच्या कमाईत वाढ झाली आहे. केकेआरने यावेळी १३ कोटी देऊन रिंकूला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान ८ नोव्हेंबरपासून ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी रिंकू सिंग भारतीय संघाचा भाग असून, या दौऱ्यासाठी भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकाविरूद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे.