India vs Bangladesh 2nd Test: भारत विरुद्ध बांगलादेश संघात सध्या कसोटी मालिका सुरू असून दुसरा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू झाला आहे. पण पहिल्या दिवशीच सातत्याने पावसाच्या सरी बरसत असल्याने ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला.
दरम्यान, असं असलं तरी पहिल्याच दिवशी भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचे काही संवादही सोशल स्टंपमाईकमध्ये कैद झाले आहेत. त्यातील एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये पंत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला सल्ला देताना दिसला आहे. झाले असे की भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी आकाश दीपने पहिल्या डावात झाकीर हसन (०) आणि शादमन इस्लाम (२४) या बांगलादेशी सलामीवीरांना बाद केले.
पण त्यानंतर बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हुसैन शान्तो आणि मोमिनुल हक यांनी बांगलादेशचा डाव सावरताना त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी पहिल्या सत्रापर्यंत नंतर विकट जाऊ दिली नव्हती. दुसऱ्या सत्रातही त्यांनी सुरूवात चांगली केलेली.
मात्र, २९ व्या षटकात आर अश्विन गोलंदाजीला आला. अश्विनविरुद्ध शान्तोने याआधी सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. पण २९ व्या षटकात अश्विनने चौथा चेंडू टाकल्यानंतर यष्टीमागून ऋषभ त्याला म्हणाला, 'ऍश भाई जरा चेंडू पुढे टाकावा लागेल.' त्यानंतर अश्विनने त्याच्या चेंडूचा टप्पा थोडा पुढे ठेवला आणि त्यात शान्तो बचावात्मक फटका खेळताना फसला.
चेंडू त्याच्या पॅडला लागून दुसऱ्या स्लीपमध्ये असलेल्या शुभमन गिलकडे गेला. त्यामुळे पंचांनी त्याला बाद दिले. पण शान्तोने रिव्ह्यु घेतला. मात्र रिव्ह्युमध्ये स्पष्ट झाले की चेंडू पॅडला आधी लागला होता आणि मधल्या स्टंपवरही जात होता. तसेच जरी चेंडूचा स्पर्श बॅटला झाला असता, तरी गिलने त्याचा झेल घेतला होता.
दरम्यान, शान्तोने ५७ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर काही वेळाने पुन्हा पावसाला सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोर वाढल्याने पहिल्या दिवसाचा खेळच थांबवण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने ३५ चेंडूत १०७ धावा केल्या. मोमिनुल हक ८१ चेंडूत ४० धावांवर नाबाद राहिला, तर मुश्फिकुर रहिम ६ धावांवर नाबाद राहिला.
दरम्यान, शान्तोला बाद करत अश्विनने एक मोठा विक्रमही केला आहे. आशिया खंडात खेळताना त्याने घतलेली ही ४२० वी विकेट ठरली. त्यामुळे आता तो आशियामध्ये खेळताना कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळेला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
कुंबळेने आशियामध्ये कसोटीत ४१९ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर ६१२ विकेट्ससह मुथय्या मुरलीधरन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.