India vs Bangladesh Chennai Test: भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे सुरू आहे. या सामन्यात दोन्ही संघात चुरस दिसत आहे. पण दरम्यान, दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना डिवचण्याच्या संधी सोडताना दिसत नाहीयेत. त्यांच्यातील काही संभाषण स्टंप माईकमध्येही कैद झाला आहे. त्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहे.
एका व्हिडिओमध्ये दिसते की भारताच्या दुसऱ्या डावात विराट कोहली शुभमन गिलबरोबर फलंदाजी करत असताना त्याला बांगलादेशी खेळाडू षटकार मार म्हणून डिवचत होते.
तसेच असाच आणखी एक व्हिडिओ आहे, ज्यात बांगलादेशच्या गोलंदाजांकडून यॉर्कर्सचा मारा होत असताना नॉन स्ट्रायकरला असलेला विराट क्षेत्ररक्षण करत असलेल्या बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूला विचारतो की 'मलिंगा बनलाय का? यॉर्करवर यॉर्कर टाकत आहे.'
दरम्यान विराट या डावात १७ धावांवर मेहदी हसन मिराजविरुद्ध खेळताना पायचीत झाला. पण त्याची ही विकेट वादात अडकली कारण त्याने रिव्ह्यु घेतला नाही. पण जेव्हा तो माघारी परतल्यानंतर रिप्ले दाखवण्यात आला, त्यात चेंडूचा स्पर्श आधी त्याच्या बॅटला झाल्याचे दिसले आणि मग तो चेंडू पॅडला लागल्याचे स्पष्ट झाले. पण तोपर्यंत विराट मैदानातून बाहेर गेलेला होता.
तथापि, केवळ विराटचाच व्हिडिओ नाही, तर ऋषभ पंतही सातत्याने बांगलादेशचा पहिला डाव सुरू असताना स्टंपमागून यष्टीरक्षण करत असताना काही ना काही बोलत असतानाचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत.
एका व्हिडिओमध्ये दिसते की लिटन दास आणि शाकिब अल हसन बांगलादेशने ४० धावांवर ५ विकेट्स गमावल्यानंतर त्यांचा डाव सावरत होते. यावेळी त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी पंत आपल्याच संघातील खेळाडूंशी काहीतरी बोलताना दिसत होता.
एकावेळी रविंद्र जडेजा आणि आर अश्विन असे दोघेही दोन्ही बाजूंनी गोलंदाजी करत असताना पंत जडेलाला म्हणत होता, 'जड्डू भाई चारही बाजूंनी तूच दिसत आहेत. पुढे-मागे सगळीकडे तूच आहेत.'
त्यानंतर पंत अश्विनला लिटन दासविरुद्ध अराऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी मनवत होता, पण अश्विन त्याचं ऐकत नव्हता.
त्यावेळी पंत त्याला म्हणाला,'ऍश भाई, याच्याबरोबर आपण खेळू शकतो.' त्याचवेळी विराट अश्विनशी काहीतरी बोलताना पंतला दिसला. तेव्हा पंत अश्विनला असंही म्हणाला, 'विराट भाईचं तरी ऐक'. दरम्यान, हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ९१.२ षटकात सर्वबाद ३७६ धावा केल्या.
त्यानंतर बांगलादेशला प्रत्युत्तरात पहिल्या डावात ४७.१ षटकात १४९ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताला २२७ धावांची आघाडीही मिळाली. दुसऱ्या डावात भारताने दुसऱ्या दिवस अखेर २३ षटकात ३ बाद ८१ धावा केल्या असल्याने आता भारताकडे ३०८ धावांची आघाडी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.