India vs New Zealand 3rd Test: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील मुंबईला झालेल्या तिसऱ्या कसोटीत २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारतावर व्हाईटवॉशची नामुष्की ओढावली. भारतीय संघ पहिल्यांदाच मायेदशात ३-० अशा फरकाने कसोटी मालिकेत पराभूत झाला आहे.
दरम्यान, रविवारी मुंबई कसोटीचा तिसरा दिवस होता. या दिवशी ऋषभ पंतची विकेट वादग्रस्त ठरली. तसेच त्याची विकेट सामन्याला कलाटणी देणारीही ठरली.
रविवारी न्यूझीलंडने भारतासमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २९ धावांवरच ५ विकेट्स गमावल्या होत्या.
यामध्ये यशस्वी जैस्वाल (५), रोहित शर्मा (११), विराट कोहली (१), शुभमन गिल (१) आणि सर्फराज खान (१) यांच्या विकेट्सचा समावेश होता. पण यानंतर ऋषभ पंतने आधी रविंद्र जडेजाला साथीला घेत भारताचा डाव सावरला. त्यांनी ४२ धावांची भागीदारी केली. पण जडेजाही नंतर २२ चेंडू खेळून ६ धावांवर बाद झाला.
पण पंतने त्याचा आक्रमक खेळ सुरू ठेवला होता. त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबतही ३५ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.