India vs Bangladesh 2nd Test Match: भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध कानपूरला झालेल्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका २-० ने जिंकली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्याच्या कोचिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली भारताने मिळवलेला पहिला कसोटी मालिका विजय ठरला.
भारतीय संघ गौतम गंभीर, अभिषेक नायर, मॉर्ने मॉर्केल, टी दिलीप आणि रायन टेन डोईशेट या कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली पुढील तीन वर्षे खेळताना दिसणार आहे. त्यांच्यापूर्वी राहुल द्रविडच्या कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शन भारताला मिळाले होते. आता या कोचिंग स्टाफमध्ये झालेल्या बदलाबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित बांगलादेशविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर म्हणाला, 'आपण पुढे जात असतो. नक्कीच असं बऱ्याचदा होतं की आपल्याला वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करावं लागतं. जेव्हा राहुल भाई (द्रविड) म्हणाला की तो आता काम थांबवत आहे, तेव्हा आम्ही अनेक चांगल्या आठवणी घेऊन पुढे गेलो.'
'गौतम गंभीरबाबत सांगायचे झाले, तर मी त्याच्याबरोबर खेळलो आहे आणि त्याची मानसिकता कशी आहे, याची कल्पना मला आहे. हे सुरुवातीचे दिवस आहे, पण आमची सुरुवात चांगली झाली आहे.'
दुसऱ्या कसोटीतील अडीच दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर भारताने विजय मिळवण्यात यश मिळवले.
याबद्दल रोहित म्हणाला, 'जेव्हा सामन्यातील अडीच दिवस वाया गेल्यानंतर जेव्हा आम्ही चौथ्या दिवशी मैदानात उतरलो, तेव्हा आम्हाला त्यांना लवकरात लवकर बाद करायचे होते आणि त्यानंतर आम्ही फलंदाजीत काय करू शकतो हे पाहायचे होते. जेव्हा आम्ही त्यांना २३० च्या आसपास बाद केले, तेव्हा फक्त धावांच महत्त्वाच्या नव्हत्या, तर षटकेही किती खेळू शकतो, हे महत्त्वाचे होते. खेळपट्टीतून फार मदत नव्हती. या खेळपट्टीवर सामन्याचा निकाल लावणे, हे खरंच वाखणण्याजोगे आहे.'
या सामन्यात पहिल्या दिवशी ३५ षटकांचा खेळ झाल्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला होता. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावात बांगलादेशला २३३ धावांवर सर्वबाद केले.
त्यानंतर भारताने आक्रमक फलंदाजी करताना ३४.४ षटकातच ९ बाद २८५ धावा करत पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या १४६ धावांत गुंडाळला. त्यामुळे पहिल्या डावातील ५२ धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर केवळ ९५ धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने १७.२ षटकाच पूर्ण केले.
रोहित पुढे म्हणाला, 'जेव्हा आम्ही आक्रमक खेळण्याचा निर्णय घेतलेला, तेव्हा खरंतर ती मोठी जोखीम होती. कारण जेव्हा तुम्ही आक्रमक फलंदाजी अशी करता, तेव्हा कमी धावसंख्येवर बाद होण्याची शक्यता असते. पण आम्ही जरी १००-१५० धावांच सर्वबाद झालो असतो, तरी आम्ही तयार होतो.'
रोहित शर्माने आकाश दीपचेही कौतुक केले. त्याने खूप देशांतर्गत क्रिकेटही खेळले असल्याने त्याचा फायदा होत असल्याचेही त्याने सांगितले. आकाश दीपने या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या, तर पहिल्या डावात २ षटकारांसह १२ धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.