Tamil Nadu vs Delhi: तमिळनाडू संघ रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचा सामना दिल्लीविरूद्ध खेळत आहे. सामन्यातील पहिल्याच दिवशी तमिळनाडूने दिल्लीसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. तमिळनाडूने पहिल्या दिवशी केवळ १ विकेट गमावत ३७९ धावा उभारल्या आहेत. ज्यामधे साई सुदर्शनने द्विशतक झळकावले तर वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांसह शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर दुसरीकडे झारखंडविरूद्ध रेल्वे्स सामन्यात भारतीय फलंदाज ईशान किशनने शतक झळकावले आहे.
दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु अरूण जेटली मैदानावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय दिल्लीच्या अंगलट आला. तमिळनाडूच्या सलामी फलंदाजांनी दिल्लीच्या नाकी नऊ आणले. सलामीवीर साई सुदर्शन आणि नारायन जगदीशनने पहिल्या विकेटसाठी तब्बल १६८ धावांची भागीदारी केली. पुढे नवदीप सैनीने जगदीशनला त्रिफळाचीत केले आणि जगदीशन ६५ धावा करून परतला.
त्यानंतर सुदर्शनने वॉशिंग्टन सुंदरला साथीला घेत पुन्हा नव्याने खेळी उभारली. सुदर्शन व वॉशिंग्टनने पहिला दिवस समाप्तीपर्यंत २११ धावांची भागीदारी केली. दरम्यान साई सुदर्शनने दणदणीत द्विशतक ठोकले. त्याने २३ चौकार व १ षटकाराच्या मदतीने द्विशतक लगावले व २०२ धावांवर नाबाद आहे. तर वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांसह शतकाच्या उंबरठ्यावर आहे.