Rahul Dravid, Samit Maharaja T20 : भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड याचा मुलगा समित सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरतोय... राहुलने त्याच्या मुलाला प्रसिद्धीपासून नेहमी दूर ठेवले. पण, समितने त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून मुक्त झालेला द्रविड मुलाची फटकेबाजी पाहून नक्की सुखावला असेल. महाराजा ट्वेंटी-२० स्पर्धेत समितचे नाणे खणखणीत वाजतेय...
मैसूर वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करताना समितने मारलेले कौशल्यपूर्ण फटके पाहून चाहत्यांना द्रविडचीच आठवण होत आहे. गुलबर्गा मिस्टीक्स संघाविरुद्ध समितने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह, हूक शॉट अन् लॉफ्टेड सिक्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या समितने २४ चेंडूंत ३३ धावांची खेळी करताना कर्णधार करुण नायरसह महत्त्वाची भागिदारी केली. समितने त्याच्या खेळीत चार सुंदर चौकार व एक अप्रतिम षटकार खेचला.
करुण नायरने ३५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. जगदीशा सुचिथने १३ चेंडूंत ४० धावा चोपून संघाला ८ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात, मिस्टिक्सने १३.३ षटकांत ५ बाद ११८ धावा केल्या होता. राहुल द्रविडच्या मुलाला महाराजा ट्रॉफी ट्वेंटी-२० लीगच्या लिलावात मैसूर वॉरियर्स संघाने ५० हजारांत आपल्या ताफ्यात घेतले. मैसूरचा संघ मागच्या वर्षी उपविजेता होता.