India vs South Africa 4th T20I: दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाच्या निर्धाराने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात मैदानावर उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी धावांचा एव्हरेस्ट उभा केला. संजू सॅमसन ( Sanju Samson) व तिलक वर्मा ( Tilak Varma) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी दोनशेपार भागीदारी करून आफ्रिकेच्या गोलंदाजांना रडवले.
दोघांनी शतक झळकावताना संघाला २० षटकात १ बाद २८३ इतकी मोठी धावसंख्या उभारून दिली. एका वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३ शतक झळकावणारा संजू हा जगातील पहिला फलंदाज ठरला. तेच तिलकनेही सलग दुसरे शतक झळकावून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सलग दोन शतके करणाऱ्या दुसऱ्या (पहिला संजू) भारतीय फलंदाजाचा मान मिळवला.
अभिषेक शर्माने १८ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ३६ धावांची वादळी खेळी करून भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने संजूसह पहिल्या विकेटसाठी ५.५ षटकांत ७३ धावा जोडल्या. त्यानंतर संजू सॅमसन व तिलक वर्मा ही वादळं घोंगावली.