Rahul Dravid set to return in IPL: इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या आधी प्रत्येक फ्रँचायझी पुढीलवर्षीच्या तयारीला लागले आहेत. त्यातच २००८ आयपीएलचे विजेते राजस्थान रॉयल्सने भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला मोठी जबाबदारी सोपवली आहे. द्रविडला राजस्थानने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
दरम्यान, द्रविडने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त खेळाडू म्हणूनच नाही, तर प्रशिक्षण क्षेत्रातही मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे त्याचा जूनच्या अखेरीस भारतीय संघाबरोबरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून करार संपल्यानंतर त्याला अनेक आयपीएल फ्रँचायझींकडून प्रशिक्षकपदाच्या ऑफर देण्यात आल्या.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार राहुल द्रविडला अनेक फ्रँचायझींकडून विचारण्यात आले होते, परंतु त्याने राजस्थान रॉयल्सची निवड केली. त्याला बऱ्याच फ्रँचायझींकडून त्याला त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी ब्लँक चेकही ऑफर करण्यात आला होता. मात्र, यानंतरही त्याने राजस्थान रॉयल्सबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.