Delhi Capitals: आयपीएल २०२५ साठी दिल्ली कॅपिटल्सने (DC) माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला क्रिकेट संचालक पदावरून हटवले आहे. काही दिवसांपूर्वी कॅपिटल्सने मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता कॅपिटल्सने सौरव गांगुलीला संचालक पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी क्रिकेट संचालक म्हणून वेणुगोपाल राव आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून हेमांग बदानी यांना नियुक्त केले आहे. तर, गांगुलीवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्समधील क्रिकेट संस्थेंच्या संचालकपदी सौरव गांगुलीची नियुक्ती करण्यात आली. ज्यात दिल्ली कॅपिटल्स महिला (WPL) संघ आणि दक्षिण आफ्रिकेतील (SA20) लीगमध्ये खेळणाऱ्या प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचा समावेश आहे.
सौरव गांगुलीची मार्च २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स साठी क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु केवळ एका वर्षाच्या कालावधीनंतर सौरव गांगुलीला संचालक पदावरून बाजूला करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाज रिकी पाँटिंगची २०१८ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली कॅपिटल्सने २०१९, २०२० आणि २०२१ मध्ये सलग तीन वर्ष प्लेऑफ गाठला होता. त्याने त्याच्या कार्यकाळात चांगली सुरुवात केली होती. त्याच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्सने २०२० आयपीएल हंगामात त्यांची पहिली अंतिम फेरी गाठली होती.
हेमांग बदानी व वेणुगोपाल राव आजपासून दिल्ली कॅपिटल्स सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाले आहेत दिल्ली कॅपिटल्सने पुढील दोन आयपीएल हंगामांसाठी त्यांच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची निवड केली आहे. हेमांग बदानी यांची मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड करण्यात आली असून वेणुगोपाल राव हे क्रिकेटचे नवे संचालक म्हणून काम पाहतील.