England vs Sri Lanka 3rd Test : श्रीलंकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडला पराभवाची चव चाखवली. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेला २६३ धावा करता आल्या. पण, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आणि इंग्लंडचा दुसरा डाव १५६ धावांवर गुंडाळला. २१९ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने ८ विकेट्स राखून सहज पार केले. पथुम निसंकाने नाबाद १२७ धावांची खेळी केली.
Pathum Nissanka हा १००चा स्ट्राईक रेटने कसोटीत १०० हून अधिक धावा करणारा श्रीलंकेचा पाचवा फलंदाज ठरला. आज त्याने १२४ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह नाबाद १२७ धावा केल्या. यापूर्वी महेला जयवर्धने ( १३० वि. बांगलादेश, कोलंबो, २००१), सनथ जयसूर्या ( १०७ वि. झिम्बाब्वे, हरारे, २००४), अरविंद डी सिल्वा ( १०४ वि. पाकिस्तान, कोलंबो, १९९७) व रोमेश कालुवितरणा ( १०० वि. न्यूझीलंड, ड्युबडीन, १९९७) यांनी असा पराक्रम केला आहे.
इंग्लंडच्या धर्तीवर श्रीलंकेचा हा चौथा कसोटी विजय आहे. यापूर्वी श्रीलंकेने १९९८ मध्ये ओव्हल कसोटीत १० विकेट्स, २००६ मध्ये नॉटिंगहॅम कसोटीत १३४ धावांनी आणि २०१४ मध्ये लीड्स कसोटीत १०० धावांनी विजय मिळवला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम रन रेट असणाऱ्या संघांमध्ये श्रीलंकेने आजच्या विजयाने ४.६९ रन रेटसह चौथे स्थान पटकावले. या विक्रमात पाकिस्तान ४.९३च्या रन रेटने ( वि. भारत, लाहोर, २००६) आणि इंग्लंड ४.७३ च्या रेटने ( वि. आयर्लंड, लॉर्डस २०२३) आघाडीवर आहेत.
इंग्लंडमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना शतक झळकावणाऱ्या परदेशी फलंदाजांमध्ये पथुम निसंकाने स्थान पटकावले आहे. गॉर्डन ग्रिनीज यांनी १९८४ मध्ये लॉर्ड्सवर नाबाद २१४ धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्यानंतर आर्थर मॉरिस ( १८२, हेडिंग्ले, १९४८), डॉन ब्रॅडमन ( १७३*, हेडिंग्ले, १९४८), ग्रॅमी स्मिथ ( १५४*, एडबस्टन, २००८), पथूम निसंका ( १२७*, ओव्हल, २०२४) असा क्रम येतो.
श्रीलंकेसाठी कसोटीच्या चौथ्या डावातील मॅन विनिंग खेळीमध्ये निसंकाचा तिसरा क्रमांक येतो. कुसल परेराने २०१९मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे नाबाद १५३ आणि अरविंदा डी सिल्वाने १९९८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कोलंबो येथे नाबाद १४३ धावा केल्या होता.
श्रीलंकेने आज इंग्लंडमध्ये २१९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करणारा तो आशियातील अव्वल संघ ठरला. यापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानने हेडिंग्ले कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८० धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. तेव्हा त्यांनी भारताचा १९७१ सालचा विक्रम ( १७३ धावा वि. इंग्लंड, ओव्हल) मोडला होता.
श्रीलंकेने दुसऱ्यांदा आशिया खंडाबाहेर कसोटीत २०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्य डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३५२ धावांचा पाठलाग केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.