T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचा धुव्वा ; ॲनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडाची प्रभावी गोलंदाजी

आयपीएलमध्ये सुमार गोलंदाजी करीत असलेल्या ॲनरिक नॉर्खिया याने दक्षिण आफ्रिकेला टी-२० विश्‍वकरंडकातील सलामीचा सामना एकहाती जिंकून दिला. त्याने सात धावांमध्ये चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेचा डाव ७७ धावांमध्ये गुंडाळता आला.
T20 World Cup
T20 World Cupsakal
Updated on

न्यूयॉर्क : आयपीएलमध्ये सुमार गोलंदाजी करीत असलेल्या ॲनरिक नॉर्खिया याने दक्षिण आफ्रिकेला टी-२० विश्‍वकरंडकातील सलामीचा सामना एकहाती जिंकून दिला. त्याने सात धावांमध्ये चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेचा डाव ७७ धावांमध्ये गुंडाळता आला. माफक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने चार फलंदाज गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. दक्षिण आफ्रिकेने ड गटात विजयी सलामी देत दोन गुण कमवले.

श्रीलंकन संघ ७७ धावांवर गारद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघासमोर मोठे आव्हान नव्हते; पण गोलंदाजांना साथ देत असलेल्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचीही तारांबळ उडाली. नुवान तुषाराने रिझा हेंड्रीक्सला चार धावांवर बाद केले. दासुन शनाकाने फॉर्ममध्ये नसलेल्या एडन मार्करमला तंबूत पाठवले. त्यानंतर कर्णधार वनिंदू हसरंगा याने क्विंटॉन डी कॉक (२० धावा) व ट्रिस्टन स्टब्स (१३ धावा) यांना बाद केले; पण हेनरिक क्लासेन (नाबाद १९ धावा) व डेव्हिड मिलर (नाबाद ६ धावा) यांनी कोणतीही जोखीम न पत्करता दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्कमधील स्टेडियमवर पार पडलेल्या या लढतीत सुरुवातीपासूनच चेंडू खालीवर राहत होते. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी या खेळपट्टीवर अचूक टप्प्यात प्रभावी गोलंदाजी केली. ओटनील बार्टमॅन याने पाथुम निसांका याला तीन धावांवर बाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकन फलंदाज बाद होत गेले. ॲनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा व केशव महाराज या तीन गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन संघासाठी मौल्यवान कामगिरी बजावली.

कुशल मेंडिस (१९ धावा), कमिंदू मेंडिस (११ धावा), वनिंदू हसरंगा (०), सदीरा समरविक्रमा (०), चरिथ असलंका (६ धावा) या फलंदाजांकडून निराशा झाली. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला; पण ॲनरिक नॉर्खियाच्या गोलंदाजीवर हुकचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो १६ धावांवर ओटनील बार्टमॅनकरवी झेलबाद झाला. त्यानंतर कागिसो रबाडाने शेपूट गुंडाळले. श्रीलंकन संघ १९.१ षटकांत ७७ धावांवर आटोपला. नॉर्खिया याने चार षटकांत अवघ्या सात धावांच्या मोबदल्यात चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रबाडा व केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

विश्‍वकरंडकात वर्चस्व

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्खिया याने टी-२० विश्‍वकरंडकाच्या इतिहासात अप्रतिम गोलंदाजी करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने अकरा सामन्यांमधून २४ फलंदाज बाद केले आहेत. प्रत्येक सामन्यात त्याने किमान एक विकेट मिळवली आहे. तसेच टी-२० विश्‍वकरंडकातील पहिल्या अकरा सामन्यांचा विचार करताना त्याने सर्वात जास्त फलंदाज बाद केले आहेत.

टी-२० विश्‍वकरंडकातील सर्वात कमी धावसंख्या

  • ५५ (इंग्लंड) वि. वेस्ट इंडीज, २०२१

  • ६० (न्यूझीलंड) वि. श्रीलंका, २०१४

  • ७० (बांगलादेश) वि. न्यूझीलंड, २०१६

  • ७२ (बांगलादेश) वि. ऑस्ट्रेलिया, २०२१

  • ७७ (श्रीलंका) वि. दक्षिण आफ्रिका, २०२४

  • टी-२०मधील श्रीलंकेची कमी धावसंख्या

  • ७७ वि. दक्षिण आफ्रिका, २०२४

  • ८२ वि. भारत, २०१६

  • ८७ वि. ऑस्ट्रेलिया, २०१०

  • ८७ वि. भारत, २०१७

  • ९१ वि. इंग्लंड, २०२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.