T20 World Cup 2007, India vs Pakistan: भारतीय संघाने काही अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. यातीलच एक म्हणजे २००७ साली पहिल्या-वहिल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मिळवलेले विजय. या स्पर्धेतील भारताच्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या विजयाने झाला आणि शेवटही पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून विजेतेपदावर नाव कोरत झाला.
यातील पहिल्याच सामन्यातील विजय भारतासाठी अत्यंत रोमांचक मानला जातो. बरोबर १७ वर्षांपूर्वी म्हणजेच १४ सप्टेंबर २००७ रोजी हा सामना खेळला गेला होता. या सामन्याआधी भारताचा १३ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडविरुद्ध सामना होणार होता, परंतु पावसामुळे हा सामना रद्द झाला.
त्यानंतर भारतीय संघ डर्बनमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरले. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताकडून रॉबिन उथप्पाने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तसेच कर्णधार धोनीने ३३ धावांची खेळी केली.