संयुक्त अरब अमिराती येथे ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने दुबई आणि शाहजाह येथे खेळवले जाणार आहेत. सहावेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर अ गटात २०२०च्या उपविजेत्या भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे आव्हान असणार आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, २०१६चा चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगलादेश व स्कॉटलंड हे समोरासमोर असतील. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपद जिंकण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
श्रीलंका आणि स्कॉटलंड हे आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल झाले आहेत. प्रत्येक संघ गटात चार सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. १७ व १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. २० ऑक्टोबरला फायलन दुबईत होईल आणि उपांत्य फेरी व अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास ते Semi-final 1 मध्ये खेळतील. एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने होतील.
हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष ( यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया ( यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन
राखीव खेळाडू - उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर