न्यूयॉर्क : ज्या देशात बास्केटबॉल आणि बेसबॉलचा बोलबाला असतो. ज्या देशात त्यांनीच शोधून काढलेला अमेरिकन फुटबॉलचा खेळ सर्वाधिक लोकप्रिय असतो. त्याच अमेरिका देशात आताच्या घडीला चर्चा फक्त क्रिकेटची होत आहे. स्थानिक अमेरिकन लोकांना कळू लागले आहे की भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका देशांतील लोकांना प्रेमात पाडणारा क्रिकेट नावाच खेळ आहे तरी काय? मोठ्या उत्सुकतेने लोक क्रिकेटचा खेळ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
बालपणापासून क्रिकेटच्या खेळाची ओळख आपल्याला नकळत झालेली असल्याने आपल्याला जो खेळ सहजी कळतो तो ज्याने क्रिकेट अजिबात अनुभवले नाही त्या लोकांना क्रिकेट समजून देणे किती कठीण आहे, याची प्रचीती येते आहे. तरी बरे इथे टी-२० सामनेच होणार आहेत. नाहीतर पाच दिवस खेळून कधीकधी निकाल न लागणारा कसोटी सामन्याचा खेळ अमेरिकन लोकांना पसंत पडणे अशक्यच आहे.
भारतीय संघातील बहुतांशी खेळाडू प्रशिक्षकांच्या ताफ्यासह अमेरिकेत २६ मे रोजी येऊन दाखल झाले होते. फक्त विराट कोहली मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी संघाला येऊन मिळाला आहे. न्यूयॉर्क शहरातील हवा चांगली असल्याने भारतीय संघाला मनासारखा सराव करता आला आहे. तीन- चार चांगले दणकट सराव करून संघ मुख्य टी-२० वर्ल्डकपच्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
न्यूयॉर्कच्या ज्या मैदानावर भारतीय संघ सराव सामन्यासह चार सामने खेळणार आहे ते शहरापासून चांगलेच लांब आहे. थोडक्यात सांगायचे तर सामना होणाऱ्या गावाचे नाव न्यूयॉर्क असले तरी ते मुख्य शहरापासून चांगले ६० किलोमीटर दूर आहे. अमेरिकेत ६० किलोमीटर अंतर अगदी कोपऱ्यावर आहे असे म्हटल्यासारखे जवळचे मानले जात असले तरी या मैदानावर जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्याने सामन्यासाठी पोहोचायला प्रेक्षकांची चांगलीच दमछाक होणार आहे.
मोकळ्या जागेत स्टेडियम
न्यूयॉर्क शहरापासून जवळपास ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या लाँग आयलंडमधील नासाऊ कौंटी भागात हे मैदान आयसेनहॉवर पार्क प्रभागात वसवले गेले आहे. विश्वास बसणे कठीण आहे; पण मोकळ्या माळरानासारख्या जमिनीतून ३० हजारपेक्षा जास्त क्षमतेचे मैदान जेमतेम १०० दिवसांत बांधले गेले आहे.
‘आयसीसी’ची हुशारी
‘आयसीसी’ने मोठ्या हुशारीने स्पर्धेची तिकीटविक्री केली आहे. भारत वि. पाकिस्तान सामन्याला सर्वांत जास्त मागणी असणार हे लक्षात घेऊन त्या सामन्याची तिकिटे उरलेल्या दोन सामन्यांसह प्रेक्षकांना घ्यायला लावली आहेत. म्हणजेच भारत वि. पाकिस्तान सामन्याचे तिकीट घ्यायचे असले तर त्यासोबत अजून दोन सामन्यांची तिकिटे गळ्यात मारली आहेत. प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची गर्दी व्हावी, या उद्देशाने हा घाट घातला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.