U19 India vs Australia Test: भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने दुसऱ्या चार दिवसीय कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही आपली शानदार कामगिरी कायम ठेवली. सौराष्ट्राचा यष्टिरक्षक फलंदाज हरवंश पांगलिया याने ११७ धावांची खेळी करताना दिवस गाजवला. त्याने अखेरच्या विकेटसाठी अनमोलजीत सिंग (नाबाद ११ धावा) याच्या साथीने १०७ चेंडूंमध्ये ९० धावांची भागीदारीही रचली.
भारताच्या १९ वर्षांखालील संघाने पहिल्या डावात ४९२ धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाने दुसऱ्या दिवसअखेरीस तीन बाद १४२ धावा केल्या असून आता त्यांचा संघ ३५० धावांनी पिछाडीवर आहे.
भारताच्या १९ वर्षांखालील संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असे यश मिळवले. त्यानंतर पहिल्या चार दिवसीय लढतीत थरारक विजयही मिळवला. दुसऱ्या चार दिवसीय लढतीचा पहिला दिवस गाजवला. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने सोमवारी, पहिल्या दिवशी पाच बाद ३१६ धावा फटकावल्या होत्या.
मंगळवारी सकाळच्या सत्रात ओली पॅटरसनने कर्णधार सोहम पटवर्धनला ६३ धावांवर बाद करीत धक्का दिला. त्यानंतर हरवंश पांगलिया याने तळाच्या फलंदाजांसोबत मोलाच्या भागीदाऱ्या रचत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
त्याने १४३ चेंडूंचा सामना करताना सात चौकार व सहा षटकारांसह ११७ धावांची खेळी केली. त्याला मोहम्मद इनानने २६ धावांची, समर्थ नागराजने २० धावांची आणि अनमोलजीत सिंगने नाबाद ११ धावांची खेळी करीत उत्तम साथ दिली.
ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाकडून ओली पॅटरसन, हॅरी होएक्स्ट्रा, ख्रिस्तीयन होवा व लॅचलन रोनाल्डो यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
मोहम्मद इनान व अनमोलजीत सिंग यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाची अवस्था तीन बाद ४२ धावा अशी झाली होती; पण कर्णधार ओलिव्हर पीके व ॲलेक्स यंग या जोडीने नाबाद १०० धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला.
ओलिव्हर याने आठ चौकार व एक षटकारासह नाबाद ६२ धावांची खेळी केली. ॲलेक्स यंगने सहा चौकारांसह नाबाद ४५ धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाने तीन बाद १४२ धावा केल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक :
भारत १९ वर्षांखालील संघ- पहिला डाव सर्व बाद ४९२ धावा (नित्या पंड्या ९४, के.पी. कार्तिकेय ७१, सोहम पटवर्धन ६३, निखिलकुमार ६१, हरवंश पांगलिया ११७, हॅरी एच. २/४१, ख्रिस्तीयन होव २/४३) वि. ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघ- पहिला डाव तीन बाद १४२ धावा (ओलिव्हर पीके खेळत आहे ६२, ॲलेक्स यंग खेळत आहे ४५, मोहम्मद इनान २/२७).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.