नागपूर : येत्या १० मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ४१ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबईविरुद्ध अंतिम लढत खेळण्यासाठी विदर्भाला उपांत्य लढतीच्या शेवटच्या दिवशी ५३ मिनिटे पुरेशी ठरली. यश ठाकूरने कुलवंत खेजरोलियाचा त्रिफळा उडविला आणि मध्य प्रदेशवर ६२ धावांनी विजय मिळवून विदर्भाने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. विदर्भाने २०१७-१८ च्या मोसमात इंदूर येथे सर्वप्रथम दिल्लीचा पराभव करून, तर १८-१९ मध्ये नागपुरात सौराष्ट्राचा पराभव करून सलग दोन विजेतीपदे मिळविली होती.
विजयासाठी आवश्यक असलेल्या ३२१ धावांचा पाठलाग करताना सारांश जैन व कुमार कार्तिकेयने आक्रमक फलंदाजीचा इरादा जाहीर केला होता. त्यात कार्तिकेयने दोनदा आदित्य ठाकरेला समोर येऊन मारण्याचा प्रयत्न केला. कार्तिकेय बाद होताच, मध्य प्रदेशचा संघ दबावाखाली आला. त्यानंतर ठाकरेने अनुभव अग्रवालचा, तर यश ठाकूरने सारांश जैनचा त्रिफळा उडवून मध्य प्रदेशची ९ बाद २४० अशी स्थिती करून टाकली. सकाळी खेळ सुरू झाला त्यावेळी विदर्भाला जिंकण्यासाठी चार विकेटची, तर मध्य प्रदेशला ९३ धावांची गरज होती.
पराभव स्पष्ट दिसत असताना खेजरोलिया व आवेश खानने फटकेबाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना थोडेफार यशही आले. दोघांनी १८ धावांची भर घातली. अखेर १२ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर यश ठाकूरने कुलवंत खेजरोलियाचा त्रिफळा उडविला आणि मध्य प्रदेशचा डाव २५८ धावांवर गुंडाळला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रथमच शतक झळकविणाऱ्या यश राठोड सामनावीर ठरला.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ पहिला डाव १७०, मध्य प्रदेश पहिला डाव २५२, विदर्भ दुसरा डाव ४०२, मध्य प्रदेश दुसरा डाव सर्वबाद २५८ (यश दुबे ९४, हर्ष गवळी ६७, सारांश जैन २५, आवेश खान नाबाद ८, आदित्य सरवटे २-५६, आदित्य ठाकरे २-४५, यश ठाकूर ३-६०, अक्षय वखरे ३-४२).
एकाच राज्यातील दोन संघ
महाराष्ट्रात विदर्भ, मुंबई व महाराष्ट्र अशा तीन क्रिकेट संघटना कार्यरत आहेत. देशातील गुजरात येथेही तीन संघटना आहेत. मात्र, एकाच राज्यातील दोन संघ अंतिम फेरीत पोहचण्याची ही केवळ दुसरी वेळ होय. यापूर्वी १९७०-७१ च्या मोसमात मुंबई (पूर्वीचे बॉम्बे) आणि महाराष्ट्र संघाने अंतिम फेरी गाठली होती. तो सामना मुंबईने ४८ धावांनी जिंकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.