Caribbean Premier League 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडूची कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. संघाला विजयासाठी ११ चेंडंत २७ धावांची गरज असताना पठ्ठ्याने ६,०,६,६,६ अशी फटकेबाजी करून Trinbago Knight Riders ला ५ चेंडू व ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. St Lucia Kingsच्या तोंडचा घास पळवला.
सेंट ल्युसिया किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १८७ धावा उभ्या केल्या. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ३४) आणि जॉन्सन चार्ल्स ( २९) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोस्टन चेसने ४० चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. त्याला भानुका राजपक्षाने ३३ धावांची खेळी करून साथ दिली. नाइट रायडर्सकडून सुनील नरीन व वकार सलामखैल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात जेसन रॉय ( १६) व सुनील नरीन ( १४) यांना चांगली सुरूवात करता आलेली नाही. शाकेरे पॅरिसने ३३ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह ५७ धावांची खेळी करून रायडर्सना सामन्यात आणले. निकोलस पूरन ( १७) व किसी कार्टी ( १५) हे अपयशी ठरल्याने रायडर्सवरील दडपण पुन्हा वाढले. तेव्हा कर्णधार किरॉन पोलार्ड मैदानावर उभा राहिला. मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूने १९ चेंडूंत ७ षटकारांसह नाबाद ५२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. रायडर्सने १९.१ षटकांत ६ बाद १८६ धावा करून विजय पक्का केला.
किरॉन पोलार्ड हा जगातील विविध फ्रँचायझी लीगमध्ये अजूनही खेळतो. त्याने ६७९ ट्वेटी-२० सामन्यांत १३२०९ धावा केल्या आहेत आणि १ शतक व ६० अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. ८२५ चौकार व ८८६ षटकार त्याने खेचले आहेत. त्याच्या नावावर ३२२ विकेट्स नावावर आहेत.