Virat Kohli on Dinesh Karthik: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने निवृत्ती घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत पुष्टी केली आहे. आयपीएल 2024 मधील एलिमिनेटर सामन्यात कार्तिक बंगळुरूकडून अखेरचा खेळला.
त्याला या सामन्यानंतर बंगळुरू संघाने गार्ड ऑफ ऑनरही दिला होता. कार्तिकची आयपीएल 2024 मधील कामगिरीही शानदार राहिली. दरम्यान, बंगळुरूने शुक्रवारी (24 मे) व्हिडिओ शेअर केल आहे. ज्यात त्याच्याबद्दल त्याची पत्नी दिपीका पल्लिकल, बंगळुरूचे खेळाडू, सपोर्ट्स स्टाफ आणि चाहते बोलत आहेत.
यादरम्यान, बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीनेही कार्तिकबद्दल भाष्य केले आहे. कार्तिकची वाईट काळात कशी मदत झाली आणि त्याच्याबद्दल सुरुवातीच्या काय भावना होत्या, याबाबत विराटने भाष्य केले आहे.
विराट म्हणाला, 'मैदानाबाहेर माझ्या कार्तिकबरोबर खूप मस्त आणि मनोरंजक गप्पा झाल्या आहेत. तो हुशार व्यक्ती आहे, त्याला फक्त क्रिकेटचे नाही, तर इतर अनेक गोष्टींचे चांगले ज्ञान आहे. मला त्याच्याबरोबर चर्चा करण्यात मजा आली.'
'जेव्हा 2022 मध्ये माझ्यासाठी फार खास आयपीएल हंगाम जात नव्हता, मी आत्मविश्वास मिळवण्यासाठी संघर्ष करत होतो, तेव्हा अनेकदा कार्तिकने बसून माझ्याशी चर्चा केली आणि त्याला काय वाटत आहे याबाबत मला प्रामाणिक प्रतिक्रिया दिली. कदाचीत मलाही ज्या गोष्टी दिसत नव्हत्या त्या मला सांगितल्या.'
विराटला 2022 आयपीएलमध्ये 16 सामन्यांत 341 धावाच करता आल्या होत्या.
विराट पुढे म्हणाला, 'कोणाकडेही जाऊन त्याला जे चांगले वाटते, ते जाऊन सांगायची त्याची प्रामाणिकता आणि धैर्य मला आवडते. मला वाटते कार्तिकबाबत माझ्यासाठी हीच खूप खास गोष्ट आहे. आमचे खूप खूप चांगले बान्डिंग झाले.'
याशिवाय कार्तिकबरोबर पहिल्या भेटीबाबतही विराटने सांगितले. तो म्हणाला, 'मला आठवते जेव्हा मी कार्तिकला पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेत 2009 चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत असू.'
'मी त्यावेळी कार्तिकबरोबर पहिल्यांदा ड्रेसिंग रुम शेअर करत होतो आणि मला तो खूप प्रसन्न, अतिसक्रिय आणि थोडा गोंधळलेला आणि न थांबता सगळीकडे फिरणारा व्यक्ती वाटलेला. कार्तिकबद्दल ही माझी पहिली आठवण होती.'
'अफलातून कौशल्य, शानदार फलंदाज. मात्र, त्याची पहिली आठवण आणि आत्ताच्या कार्तिकमध्ये फार अंतर नाही. फक्त तो अधिक हुशार आणि खूप शांत झाला आहे.'
विराट आणि कार्तिक भारतीय संघात आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून एकत्र खेळले आहेत. कार्तिकने आयपीएल 2024 मध्ये 15 सामन्यांत 326 धावा केल्या.
कार्तिकने त्याच्या कारकिर्दीत 180 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1 शतक आणि 17 अर्धशतकांसह 3463 धावा केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षण करणाना त्याने 123 विकेट्स घेतल्या. त्याने आयपीएलमध्ये 257 सामन्यांमध्ये 4842 धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.