Virender Sehwag IPL team coach: वीरेंद्र सेहवाग हे भारतीय क्रिकेटमधील खूप मोठं नाव... त्याची आक्रमकता ही भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारी. कसोटीत त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज असलेल्या वीरूलाल टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पाहायला चाहत्यांना नक्की आवडेल. पण, वीरूलाच ही जबाबदारी नकोय.. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या वीरूने नंतर मेंटॉर आणि समालोचकाची भूमिका पार पाडली आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०१४ आणि २०१५ मध्ये पंजाब किंग्सचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर २०१६मध्ये संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये गेला आणि नंतर संचालक बनला. २०१८ पर्यंत तो PBKS सोबत होता.
२०१७ मध्ये वीरूने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, परंतु क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची निवड केली. त्यानंतर वीरूने पुन्हा यासाठी प्रयत्न केले नाही. आता सेहवागनेही तो विचार सोडून दिला आहे. एकवेळ आयपीएल संघाचा कोच होईन, परंतु टीम इंडियाचा नाही, असा पवित्रा त्याने घेतलेला दिसतोय.
तो म्हणाला,''मला प्रशिक्षकपदासाठी विचारणा झाली तर मी नक्कीच आयपीएल संघाचा विचार करेन, परंतु भारतीय संघाचा नाही. कारण, जर मी टीम इंडियाचा कोच बनलो तर १५ वर्ष खेळाडू म्हणून जे रुटीन होतं ते पुन्हा सुरू होईल. मी १५ वर्ष संघासोबत होतो, वर्षातील ८ महिने घरच्यांपासून दूर होतो. आता माझी मुलं १४ व १६ वर्षांची आहेत आणि त्यांना माझी गरज आहे. दोघंही क्रिकेट खेळतात. एक फिरकीपटू आहे, तर दुसरार सलामीचा फलंदाज आहे. मला त्यांना शिकवायचे आहे आणि त्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे.''
''जर मी टीम इंडियाचा कोच बनलो आणि संघ ८ महिने दौऱ्यावर असल्यास माझ्यासमोर हे मोठं आव्हान असेल. मग मला मुलांना वेळ देता येणार नाही. पण, तेच मी आयपीएल संघाचा कोच किंवा मेंटॉर झालो तर मला तो वेळ देता येईल. त्यामुळेच मी याचा विचार करू शकतो,''असे वीरू म्हणाला.
वीरेंद्र सेहवागने १०४ कसोटी सामन्यांत २३ शतकं व ३२ अर्धशतकांसह ८५८६ धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये २५१ सामन्यांत त्याच्या नावावर १५ शतकं व ३८ अर्धशतकांसह ८२७३ धावा आहेत. त्याने १९ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३९४ धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.