India vs New Zealand Pune Test Match: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यातील पहिला दिवस फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने गाजवला. पुण्याच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी केली.
गुरुवारी (२४ ऑक्टोबर) सुरू झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे (७६) आणि रचिन रविंद्र (६५) यांनी चांगला खेळ करताना अर्धशतकेही केली. शेवटी मिचेल सँटेनरनेही (३३) चांगली झुंज दिली.
मात्र न्यूझीलंडचे बाकी फलंदाज आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे फार काळ टिकाव धरू शकले नाहीत. अश्विनने न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील पहिल्या तीन विकेट्स घेतल्या, त्यानंतरच्या सर्व सात विकेट्स वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव ७९.१ षटकात २५९ धावांवर संपला.