Asia Cup 2024 : सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर आशिया करंडक महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध सामना होत आहे. हा सामना जिंकून उपांत्य फेरी निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.
दोन गटात प्रत्येकी चार संघ असून प्रत्येक संघाला तीन साखळी सामने खेळावे लागणार आहेत आणि यातील किमान दोन सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरी गाठणार आहे. भारताने सलामीलाच पाकिस्तानचा अडथळा सहजपणे पार करून आपली ताकद दाखवली आहे.
भारताच्या तुलनेत अमिरातीचा संघ दुबळा आहे. त्यामुळे भारतीय संघ आज किती मोठा विजय मिळवतो याची उत्सुकता असेल, असे असले तरी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ गाफील राहणार नाही.
गोलंदाजीत अधिक अचूकता आणावी लागणार आहे. कालच्या सामन्यात पाकिस्तानला १०८ धावांत गुंडाळले असले तरी एक वेळ अशी होती की, पाकची अवस्था सहा बाद ६१ अशी केली होती. या सामन्यात हरमनप्रीतने पाच गोलंदाजांचा वापर केला त्यातील चौघांनी यश मिळवले, त्यामुळे गोलंदाजांना परिस्थितीचा अंदाज आलेला आहे.
अमिराती संघाला सलामीच्या सामन्यात नेपाळविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात ते कशी प्रगती करतात हे महत्त्वाचे आहे.
फॉर्मात असलेली स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी कालच्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली होती. उद्याच्या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच आक्रमक फलंदाजीची अपेक्षा आहे.
भारतीयांना गोलंदाजीत अचूकता आणावी लागण्याची गरज असली तरी हरमनप्रीतने गोलंदाजांचे कौतुक केले. कोणत्याही स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दडपण असते; परंतु आमच्या पूर्ण संघाने जोरदार खेळ केला. गोलंदाजी करत असताना विकेट कशा मिळतील, याचाच विचार आम्ही करत होतो, असे सांगणाऱ्या हरमनप्रीतने स्मृती आणि शेफाली यांचेही कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.