Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Women T20 World Cup 2024 India vs Australia : महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकात भारताविरुद्ध विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवला. मात्र आता भारतासमोरील आव्हान कठीण झाले आहे.
Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup 2024
Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup 2024Sakal
Updated on

Women's T20 World Cup, Australia won against India: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला अटीतटीच्या लढतीत ९ धावांनी पराभूत केले. यासह ऑस्ट्रेलियाने अपराजित राहत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

मात्र आता भारतासमोरील संकट वाढले आहे. भारताला आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आशा करावी लागेल की पाकिस्तान संघ सोमवारी न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत करेल.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारतासमोर विक्रमी १५२ धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने २० षटकात ९ बाद १४२ धावा केल्या. भारताकडून कर्णधार हरमनप्रीतने शेवटपर्यंत झुंज देत अर्धशतक झळकावले होते. मात्र तिचे प्रयत्न भारताला विजय मिळवून देण्यासाठी अपूरे पडले.

दरम्यान, हा सामना चालू असतानाच ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला होता. कारण भारताला विजयासाठी झुंजायला लावल्याने त्यांचा नेट रन रेट चांगला राहिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दोन संघातील स्थान निश्चित केले होते. पण नंतर विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने ए ग्रुपमध्ये अव्वल स्थानही निश्चित केले.

Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup 2024
Harmanpreet Kaur: भारतीय महिलांचा कसोटीत मोठा पराक्रम! हरमनप्रीत असा कारनामा करणारी बनली पहिलीच कर्णधार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून सलामीला उतरलेल्या शफाली वर्माने स्मृती मानधनासह खेळताना आक्रमक सुरुवात केली होती. परंतु, चौथ्या षटकात शफलीला ऍश्ले गार्डनरने बाद केले. शफालीने १४ चेंडूत २० धावांची खेळी केली. पाठोपाठ ६ व्या षटकात मानधनाही ६ धावांवर बाद झाली.

भारताने जेमिमा रोड्रिग्जच्या रुपात ७ व्या षटकात तिसरी विकेटही गमावली. जेमिमाहने आक्रमक खेळ केला होता, परंतु ती १६ धावांवर मेगन शटच्या गोलंदाजीवर ऍश्ले गार्डनरच्या हातात झेल देत बाद झाली.

मात्र यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिला दिप्ती शर्माची साथ मिळाली. या दोघींनी ६३ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. त्यांची भागीदारी धोकादायक ठरत असतानाच मोक्याच्या क्षणी दिप्ती शर्मी मोठा फटका खेळण्याच्या नादात १६ व्या षटकात सोफी मोलिनेक्सच्या गोलंदाजीवर जॉर्जिया वेरहॅमकडे झेल देत बाद झाली. तिने २५ चेंडूत २९ धावा केल्या.

त्याच्या पुढच्याच षटकात ऋचा घोष एक धावेवर फोबी लिचफिल्डने केलेल्या डायरेक्ट हिटवर धावबाद झाली. पण त्यानंतरही एक बाजू हरमनप्रीतने आक्रमक खेळत सांभाळली होती. तिने अर्धशतकही पूर्ण केले.

Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup 2024
PAK vs ENG Test: पाकिस्तानला शहाणपण सुचलं! बाबर आझम, शाहिन आफ्रिदीला संघातून हाकललं

अखेरचे रोमांचक षटक

अखेरच्या षटकात भारताला १४ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर हरमनप्रीतने एक धाव घेतली. मात्र पुढच्याच चेंडूवर ऍनाबेल सदरलँडने पुजा वस्त्राकरला ९ धावांवर क्लिनबोल्ड केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अरुंधती रेड्डी धावबाद झाली. चौथ्या चेंडूवरही हरमनप्रीतला मोठा फटका मारता आला नाही. या चेंडूवरही एकच धाव निघाली.

अखेरच्या दोन चेंडूत १२ धावांची गरज असताना सदरलँडने वाईड चेंडू टाकला. पण त्यावेळी धाव घेण्याचा गोंधळात श्रेयंका पाटील धावबाद झाली. भारताने पाचव्या चेंडूवरही नववी विकेट गमावली. राधा यादव पायचीत झाली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय देखील निश्चित झाला. अखेरच्या चेंडूवर रेणुका सिंगने एक धाव घेतली. अखेरीस हरमनप्रीत ४७ चेंडूत ५४ धावांवर नाबाद राहिली.

ऑस्ट्रेलियाकडून ऍनाबेल सदरलँड आणि सोफी मोलिनेक्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मेगन शट आणि ऍश्ले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Harmanpreet Kaur | Women's T20 World Cup 2024
Women's T20 World Cup 2024: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने कर्णधार बदलली, निर्णायक सामन्यासाठी असे आहेत 'प्लेइंग-११'

ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पार

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताच्या रेणुका सिंगने बेथ मुनी आणि जॉर्जिया वेरहॅम यांना एकाच षटकात लागोपाठ चेंडूंवर बाद करत चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु,ग्रेस हॅरिस आणि कर्णधार ताहलिया मॅकग्रा यांनी ६२ धावांची भागीदारी करत डाव सावरला.

या दोघी बाद झाल्यानंतर एलिस पेरीनेही आक्रमक खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकात ८ बाद १५१ धावा केल्या होत्या. ग्रेस हॅरिसने ४० धावा केल्या. ताहलिया मॅकग्रा आणि एलिस पेरी यांनी प्रत्येकी ३२ धावांची खेळी केली. अखेरीस फोबी लिचफिल्डने षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला १५० धावांचा टप्पा पार करून दिला. ती १५ धावांवर नाबाद राहिली.

गोलंदाजी करताना भारताकडून रेणुका सिंग ठाकूर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच श्रेयंका पाटील, पुजा वस्त्राकर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.