WPL 2024, DC vs RCB Final: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात रंगणार आहे. हा सामना रविवारी (17 मार्च) खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता या अंतिम लढतीला सुरुवात होणार आहे.
दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यानंतर वूमन्स प्रीमियर लीगला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे.
कारण गेल्यावर्षी या स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले होते. पण यंदा मुंबईला अंतिम सामना गाठता आलेला नाही. त्यामुळे दिल्ली आणि बेंगलोरला रविवारी पहिले विजेतेपद जिंकण्याची संधी असणार आहे.
दरम्यान, डब्ल्युपीएलमधील अनेक सामने अत्यंत रोमांचक झाले आहेत. त्यामुळे जर अंतिम सामनाही रोमांचक झाला आणि निर्धारीत 20-20 षटकांनंतर बरोबरीत सुटला किंवा सामन्याचा काही कारणास्तव निकाल लागला नाही, तर काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
बरोबरी झाली तर...
दरम्यान, डब्ल्युपीएलच्या नियमांमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे. 16.11 नियमानुसार जर अंतिम सामना निर्धारित षटकांनंतर बरोबरीत सुटला, तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. दरम्यान पहिली सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली, तर दुसरी सुपर ओव्हर होईल, जोपर्यंत निकाल लागत नाही किंवा पंच निर्णय देत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल.
निकाल लागला नाही तर...
जर एखादी अशी परिस्थिती उद्भवली की ज्यामध्ये सुपर ओव्हर खेळवली जाऊ शकत नाही किंवा सुपर ओव्हरसाठी वेळ पुरेसा नसेल किंवा सामन्याचा निकाल लागू शकत नसेल, तर अशावेळी साखळ फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल.
दरम्यान, या नियमानुसार जर सामन्याचा निकाल लागला नाही, तर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवून थेट अंतिम सामना गाठलेला दिल्ली कॅपिटल्स संघ विजेता ठरेल.
दिल्लीने अंतिम सामन्यात थेट प्रवेश मिळवला असला, तरी बेंगलोरला मात्र एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम सामना गाठावा लागला. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आणि बेंगलोर संघ तिसऱ्या क्रमांकावर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.