World Test Championship 2023-25: न्यूझीलंड क्रिकेट संघाने बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टॉम लॅथमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचाही (WTC 2023-25) भाग आहे. त्यामुळे या सामन्याचा परिणाम WTC पाँइंट्स टेबलवरही झाला आहे.
या पराभवानंतरही भारतीय संघ पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक राखून आहे. मात्र, भारताची विजयी टक्केवारी घसरली आहे. भारताची टक्केवारी ७४.२४ वरून आता ६८.०६ अशी झाली आहे.
भारताने आत्तापर्यंत १२ कसोटी सामन्यांपैकी ८ सामने जिकंले आहेत, तर ३ सामने पराभूत झाले आहेत. तसेच १ सामना अनिर्णित राहिला आहे. या पाँइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांची ६२.५० विजयी टक्केवारी आहे.