Yuvraj Singh shared Special Birthday Video for Rishabh Pant: भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी (४ ऑक्टोबर) २७ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
युवराजने पंतबाबत एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेदरम्यान ऋषभ पंत फलंदाजी करताना बांगलादेशचेच क्षेत्ररक्षण लावताना दिसला होता, या क्षणाचीही एक क्लिप युवीने आपल्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे.
तसेच या व्हिडिओमध्ये पंतचे अनेक अनसीन फोटोही युवीने टाकले आहेत. तसेच 'स्पायडरमॅन, स्पायडर मॅन... तुने चुराया मेरे दिल का चैन...' हे गाणं व्हिडिओच्या बॅकग्राउंडला वाजत आहे.
खरंतर पंत स्पायडरमॅनचा फॅन आहे, तसेच तो एका कसोटी सामन्यात यष्टीरक्षण करत असताना 'स्पायडरमॅन, स्पायडर मॅन... तुने चुराया मेरे दिल का चैन...' असं म्हणताना स्टंप माईकमध्ये कैद झाला होता. त्यामुळे तेव्हापासून त्याला स्पायडी किंवा स्पायडरमॅन असं टोपननावही पडलं आहे.
दरम्यान, युवीने शेअर केलेला व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. युवीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की 'वाढदिवसाच्या शुभेच्छा कमबॅक किंग. मेहनत करत रहा आणि तुझा निर्भीडपणा कायम ठेव. आशा आहे तुझ्यासाठी हे वर्ष भरभराटीचे ठरेल.'
ऋषभ पंतला शिखर धवन, मोहम्मद शमी, नितीश राणा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, केएल राहुल, मोहम्मद सिराज असे अनेक खेळाडूंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतनेही या शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की 'मी कृतज्ञ आहे. मला शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्यासाठी या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत. ईश्वराचा आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमामुळे माझा हा दिवस खरंच अविस्मरणीय ठरला आहे.'
पंतने नुकतेच जूनमध्ये दीड वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतचा गंभीर कार अपघात झाला होता. पण त्यातून तो सुदैवाने बचावला. त्या अपघातात त्याला गंभीर दुखापतीही झाल्या. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.
त्यामुळे त्याला त्यातून पूर्ण तंदुरुस्त होऊन क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी १४ महिन्यांचा कालावधी लागला. पण त्याने यशस्वी पुनरागमन केले आहे. पुनरागमनानंतरही त्याच्या फॉर्मवर परिणाम झालेला दिसलेला नाही. नुकतेच बांगलादेशविरुद्ध त्याने चेन्नईला झालेल्या कसोटीत त्याने ६ वे कसोटी शतकही पूर्ण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.