Yuvraj Singh's Biopic Announced: युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( २००७) आणि वन डे वर्ल्ड कप ( २०११) स्पर्धेतील विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवीवर बायोपिक निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी झाली. या बायोपिकची निर्मिती टी सीरीजचे प्रमुख भूषण कुमार आणि रवी भागचंदका यांच्या २००नॉट आउट सिनेमाद्वारे करण्यात येणार आहेत.
“माझा जीवन प्रवास हा भूषण आणि रवी यांच्याद्वारे जगभरातील चाहत्यांना दाखवला जाईल, हा मी माझा सन्मान समजतो. क्रिकेट हे माझे सर्वात मोठे प्रेम आहे. हा चित्रपट जगभरातील चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी मला आशा आहे. स्वतःच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा चाहत्यांना मिळेल,” असेही युवराजने 'द व्हरायटी'ला सांगितले.
युवराजने २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध एका षटकात सहा षटकार ठोकून विक्रमी कामगिरी केली होती. चार वर्षांनंतर, त्याने भारताच्या वन डे वर्ल्ड कप २०११ विजयात मोलाची भूमिका बजावली होती आणि त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेत युवी कर्करोगाशी झुंज देत खेळला होता आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या.