India vs Zimbabwe 4th T20I: भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (13 जुलै) झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. याबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत मालिकेतील विजयही निश्चित केला आहे.
या सामन्यात भारतासमोर झिम्बाब्वेने 153 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने एकही विकेट न गमावता 15.2 षटकात 156 धावा करत पूर्ण केले. 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली.
जयस्वाल एका बाजूने आक्रमक खेळत असताना दुसरी बाजू गिलने सांभाळली. त्यानंतर दोघेही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनीही फटकेबाजी सुरू करत अर्धशतके केली. जयस्वाल शतकाच्या जवळ होता.
मात्र, भारताच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण झाल्याने तो 53 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 93 धावांवर नाबाद राहिला. तसेच गिलनेही 39 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारासंह नाबाद 58 धावा केल्या.
तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने 28 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तसेच वेस्ली मधेवेरेने (25) आणि तादिवानाशे मारुमणी (32) यांनी छोटेखानी खेळी केल्या.
भारताकडून गोलंदाजीत खलील अहमदने 2 विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.