नवी दिल्ली : फिफा विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीत अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आलेले इगोर स्टिमॅक यांनी शुक्रवारी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्यावर टीका केली. स्टिमॅक यांनी परखड मत व्यक्त करताना म्हटले की, कल्याण चौबे जितक्या लवकर अध्यक्षपदावरून दूर होतील, तितक्या लवकर भारतीय फुटबॉल प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल.
इगोर स्टिमॅक यांनी कल्याण चौबे यांना टार्गेट करताना म्हटले की, कल्याण चौबे यांचे फक्त सोशल मीडियाला प्राधान्य होते. दिग्गज फुटबॉलपटूंसोबत फोटो काढण्याकडे त्यांचा कल होता. फुटबॉल हा जगातील सर्वात प्रसिद्ध व मोठा खेळ आहे, पण जगामध्ये भारत हा एकमेव देश आहे, जिथे फुटबॉलची प्रगती झालेली नाही. कल्याण चौबे हे नेते आहेत, पण कोलकाता येथील त्यांच्या स्थानिक ठिकाणीही त्यांना कुणीही ओळखत नाही. भारतीय फुटबॉलला प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या व्यक्तीची भारतीय फुटबॉलला सध्या गरज आहे.
सामने ठरवण्याआधी चर्चा नाही
इगोर स्टिमॅक याप्रसंगी म्हणाले की, अखिल भारतीय फुटबॉल संघटना व फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) यांच्यामध्ये परस्पर विश्वास नव्हता. एफएसडीएल यांच्या वतीने इंडियन सुपर लीग ही स्पर्धा खेळवण्यात येते. तरीही एफएसडीएल यांच्यासोबत सौहार्दपूर्ण संबंध नव्हते. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेसाठी सोशल मीडिया महत्त्वाचे असायचे. इतर बाबींवर त्यांचे लक्षच नसायचे. आंतरराष्ट्रीय लढतींचे वेळापत्रक ठरवण्याआधी माझ्याशी चर्चाही ते करीत नसत, अशी निराशा पुढे त्यांनी व्यक्त केली.
स्पष्ट रचना अन् स्थिरता नाही
अखिल भारतीय फुटबॉल संघटनेत स्पष्ट रचना व स्थिरतेचा अभाव दिसून येत आहे, असे स्पष्ट मत इगोर स्टिमॅक यांनी यावेळी व्यक्त केले. शाजी प्रभाकरण हे सरचिटणीसपदावर होते तेव्हा परिस्थिती समाधानकारक होती. त्यानंतर कल्याण चौबे हे अध्यक्षपदावर रूजू झाले आणि तेथून सर्व काही ठप्प झाले. माझ्या सहाय्यकांना मानधनही दिले जात नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानाची मागणी माझ्याकडून करण्यात आली होती, पण जीपीएस तंत्रज्ञान व व्हीओ कॅमेरा हेही उपलब्ध करून देण्यात आले नाही. बजेटचा प्रश्न निर्माण होत असेल, तर मी नवे तंत्रज्ञान घेऊन देतो असे म्हटले, पण यासाठी परवानगी देण्यात आली नाही. भारतीय संघ आशियाई करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला नाही, तर करार रद्द करण्यात येईल, असेही मला सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.