नागपूर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील स्टीपलचेस शर्यतीत केनियन धावपटूंचे वर्चस्व मोडून काढीत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकणारा मराठमोळा अविनाश साबळे सध्या भारतीय क्रीडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. मात्र, जागतिक स्पर्धेतील अपयशामुळे त्याच्यावर टीका झाली होती आणि या चुकीच्या पुनरावृत्ती करायची नाही असा निर्धार त्याने केला होता. त्यामुळे पदकापेक्षा प्रथम केनियन धावपटूंना पराभूत करायचे हेच ‘टार्गेट' निश्चित केले. तसेच झाले तर पदक जिंकताच येईल, असे अविनाश म्हणाला.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा येथील असलेला अविनाश बर्मिंगहॅम येथून बोलत होता. नवव्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडणारा अविनाश म्हणाला, जागतिक स्पर्धेच्या वेळी आमची खूप तयारी झाली होती. मात्र, संथ शर्यत झाली आणि मी त्या डावपेचात अडकलो. यावेळी वेगवान शर्यत करायचीच, असे डावपेच माझे अमेरिकन प्रशिक्षक स्कॉट सिमन्स यांनी आखून दिले होते. १९९० पासून या शर्यतीवर केनियाचे वर्चस्व असल्याने वेगवान शर्यतीसोबत केनियन धावपटूंना प्रथम मागे टाकायचे हे ‘टार्गेट' निश्चित करण्यात आले. त्यानुसार पहिल्या किलोमीटरमध्ये सुरुवात केली. त्यात ऑलिंपिक विजेता कॉन्सेल्स किपरुटो मागे पडला. शेवटचे किलोमीटरमध्ये ब्राँझपदक विजेता अमोस फेकल्या गेला. दोन फेऱ्या शिल्लक असताना मी थोडा संथ झालो आणि येथेच घोळ झाला. अन्यथा सुवर्णपदक माझेच होते. केनियन धावपटूंना पराभूत करण्याच्या डावपेचात आम्ही यशस्वी झाल्याने पदक जिंकू शकलो याचा आनंद तर आहे. विशेष म्हणजे मध्यम व लांब पल्याच्या शर्यतीमध्ये आपण आफ्रिकन धावपटूंना पराभूत करू शकतो, ही भारतीयांची मानसिकता बदलण्याची गरज होती. त्या या घटनेमुळे बदलेल अशी आशा आहे.
साधे राहणे आवडते
या रौप्यपदकामुळे तू प्रकाशझोतात आला आहेस. एकप्रकारे स्टार झाला आहेस तरीही प्रसिद्धी माध्यमांपासून दूर का राहतो? असे विचारल्यावर तो म्हणाला, मी काही स्टार वगैरे नाही. अजून मला बराच लांब पल्ला गाठायचा आहे. साधे राहणे आवडते. मला भारतातील सर्वोत्तम ॲथलिटची देण्यात येत असलेली उपमा बरोबर नाही. कारण चांगली कामगिरी करून नवीन पिढीसाठी आदर्श ठेवायचा हे माझ्ये ध्येय आहे. केवळ आठ तासाच्या अंतराने पाच हजार मीटर शर्यत धावण्याचा निर्णय माझा होता, असेही तो म्हणाला.
जिंकण्यासाठी धाव - स्कॉट
जिंकण्यासाठी धाव, शर्यत कितीही वेगवान झाली तरी केनियन धावपटूंना सोडू नको, असा सल्ला आपण अविनाशला दिला होता, असे त्याचे सध्याचे प्रशिक्षक स्कॉट सिमन्स म्हणाले. जागतिक स्पर्धेतील चुकीची आम्हाला पुनरावृत्ती करायची नव्हती. त्यामुळे आम्ही वेगवान शर्यतीसाठी तयार होतो. त्याने नवीन राष्ट्रीय विक्रम केला त्याचा आनंद आहे. पण ८ मिनीटे १३ सेकंदात जरी रौप्यपदक जिंकले असते तरी आनंद झाला असता. मात्र, त्याने शेवटच्या क्षणापर्यंत सुवर्णपदक जिंकण्यासाठी दाखवलेली जिगर खूप महत्त्वाची आहे, त्याचे मला जास्त कौतुक आहे. येत्या २६ ऑगस्टला लुसान येथे होणारी डायमंड लीग पुढील लक्ष्य असून त्यात कामगिरीत आणखी सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. तो लवकरच आठ मिनिटांच्या आत ही शर्यत पूर्ण करेल असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.