मुंबई - दुहेरीतील भारतीय टेनिसस्टार लिअँडर पेसला पुण्यात डेव्हिस करंडक लढतीत आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची संधी मिळणार आहे. सर्वाधिक विजयाची बरोबरी त्याने केली आहे. चार दशकांनंतर पुण्यात 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या लढतीचे बिगुल आज मुंबईत वाजले.
ग्रॅंड स्लॅम आणि ग्रां. प्रि. स्पर्धा होत असल्या तरी टेनिसमध्ये डेव्हिस करंडक स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच स्पर्धेतील भारत-न्यूझीलंड लढत पुण्यात होईल. पुण्यात ही लढत 43 वर्षांनंतर होत असली, तरी महाराष्ट्रात 10 वर्षांनंतर होत आहे. 2006 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियम भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया-ओशियाना यांच्यात मुकाबला झाला होता. त्या वेळी अखेरच्या एकेरीत पेसने सनसनाटी विजय मिळवून भारताच्या यशावर शिक्कामोर्तब केले होते. तोच लिअँडर आता 10 वर्षांनंतर महाराष्ट्रात इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे.
इटलीचे टेनिसपटू निकोल पित्रांजेली डेव्हिस करंडक स्पर्धेत 66 सामने खेळले असून, 42 विजय आणि 12 पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. पेसनेही आत्तापर्यंत 42 विजय मिळवले आहेत. पुण्यातील लढतीत पेस दुहेरीत खेळेल. हा सामना जिंकला, तर सर्वाधिक विजयांचा विक्रम त्याच्या आणि देशाच्या नावावर लागेल.
पर्यटनालाही चालना देणार
पुण्यातील लढतीची माहिती देण्यासाठी आज झालेल्या पत्रकार परिषदेतून लढतीचे बिगुल वाजले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या स्पर्धेच्या मुख्य विश्वस्त माजी टेनिसपटू या नात्याने असणार आहेत. कुटुंबाकडूनच टेनिसचा वारसा मिळालेल्या अमृता शालेय जीवनापासून 10 वर्षे टेनिस खेळत होत्या. आता पुण्यातील डेव्हिस लढतीच्या माध्यमातून राज्य पर्यटनालाही चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
"एमएसएलटीए'चे सरचिटणीस सुंदर अय्यर यांनी सांगितले, की लढतीचा ड्रॉ 2 फेब्रुवारी रोजी काढण्यात येईल. क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन होईल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुहेरीच्या लढतीस उपस्थित राहतील आणि त्यांच्या हस्ते पेसचा सन्मान करण्यात येणार आहे.
बालेवाडीतील संकुलात होणार लढत
-सर्व लढती प्रकाशझोतात. दुपारी तीनपासून लढती सुरू
-आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेच्या डेव्हिस लढती असलेल्या नियमांनुसार कोर्टमध्ये बदल
-हार्डकोर्टचे नूतनीकरण
-सर्वांना मोफत प्रवेश, 4000 प्रेक्षकांची तयारी
-पुणे शहरातून बालेवाडीत येण्यासाठी सरकारी आणि खासगी वाहतुकीची व्यवस्था करणार.
डेव्हिस करंडक लढतीसाठी मला मुख्य विश्वस्त करण्यात आले, हा माझा बहुमान आहे. माझे वडील अजूनही टेनिस खेळतात, मुलगीही खेळते. मी स्वतः दहा वर्षे टेनिस खेळले असल्यामुळे हा खेळ मला फार आवडतो. या लढतीच्या माध्यमातून टेनिस हा खेळ अधिक लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहे.
- अमृता फडणवीस
|