Euro Cup 2024 : प्रमुख खेळाडूंकडून बहारदार कामगिरी अपेक्षित; स्वित्झर्लंड-इटली लढतीने आजपासून बाद फेरीस सुरुवात

Switzerland vs Italy :पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे, इंग्लंडचा हॅरी केन यांना अजून फॉर्म गवसलेला नाही, त्यांच्याकडून बहारदार खेळाची प्रतीक्षा आहे.
Euro Cup 2024
Euro Cup 2024Sakal
Updated on

बर्लिन : युरो करंडक फुटबॉल स्पर्धेची साखळी फेरी संपली. आता शनिवारपासून (ता. २९) स्वित्झर्लंड व गतविजेते इटली यांच्यातील लढतीने बाद फेरीस (राऊंड ऑफ १६) सुरुवात होईल. स्पर्धेच्या या टप्प्यात प्रमुख खेळाडूंकडून लौकिकास साजेसा गोल धडाका अपेक्षित आहे.

पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे, इंग्लंडचा हॅरी केन यांना अजून फॉर्म गवसलेला नाही, त्यांच्याकडून बहारदार खेळाची प्रतीक्षा आहे. रोनाल्डो युरो करंडकाच्या इतिहासात विक्रमी सहावी स्पर्धा खेळत आहे,

पण साखळी फेरीतील तिन्ही लढतीत त्याला गोल नोंदविता आलेला नाही. बाद फेरीत पोर्तुगालची लढत दोन जुलै रोजी स्लोव्हेनियाविरुद्ध होत आहे. त्या लढतीत अचूक नेम साधल्यास ३९ वर्षीय रोनाल्डो युरो करंडकात गोल नोंदविणारा सर्वांत वयस्क ठरेल.

इंग्लंडच्या अधिकांश अपेक्षा असलेल्या ज्युड बेलिंगहॅम याने सर्बियाविरुद्ध, तर कर्णधार हॅरी केन याने डेन्मार्कविरुद्ध मैदानी गोल नोंदविला, मात्र ते अजून पूर्ण क्षमतेने खेळलेले नाहीत. मात्र या दोघांची पाठराखण करताना इंग्लंडचे मार्गदर्शक गॅरेथ साऊथगेट यांनी सांगितले, की ‘‘प्रत्येक सामन्यात प्रत्येक खेळाडू स्टार बनू शकत नाही.’’ बाद फेरीत इंग्लंड ३० जून रोजी स्लोव्हाकियाविरुद्ध खेळणार आहे.

फ्रान्सचा आंतोन ग्रीझमन, तसेच इंग्लंडचा फिल फॉडेन या अन्य प्रमुख खेळाडूंनीही स्पर्धेत निराशा केली आहे. ‘‘काहीवेळा (ग्रीझमनच्या) औदार्याचा अर्थ असा होतो, की त्याच्याकडे अपेक्षित स्पष्ट डोके नसावे,’’ असे नमूद केलेले फ्रेंच संघाचे प्रशिक्षक दिदिए देशॉ यांनी अखेरच्या साखळी लढतीत ग्रीझमनला राखीव खेळाडूंत बसविले.

बेल्जियमतर्फे सर्वाधिक गोल केलेला अनुभवी रोमेलू लुकाकू सध्या नशिबाच्या शोधात आहे. या ३८ वर्षीय खेळाडूने ई गटात केलेले तीन गोल व्हिडीओ असिस्टंट रेफरीद्वारे (व्हीएआर) अवैध ठरविण्यात आले.

फ्रान्सच्या एम्बाप्पेवर साऱ्यांच्या नजरा

फ्रेंच कर्णधार एम्बाप्पे याच्यावरही साऱ्यांच्या नजरा आहेत. त्याला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंत गणले जाते. त्याने एकमेव गोल पेनल्टी फटक्यावर पोलंडविरुद्धच्या निराशाजनक १-१ या बरोबरीत नोंदविला. या निकालामुळे फ्रान्सला ‘ड’ गटात दुसऱ्या क्रमांकावर घसरावे लागले.

नाकाच्या दुखापतीमुळे तो नेदरलँड्सविरुद्ध खेळू शकला नाही, अखेरच्या पोलंडविरुद्ध लढतीत नाकाचे संरक्षण करणाऱ्या मास्कसह त्याने पुनरागमन केले. तो खेळण्यासाठी भुकेलेला आहे, असे फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिए देशॉ यांनी आपल्या प्रमुख खेळाडूविषयी सांगितले. बेल्जियमविरुद्ध एम्बाप्पे सर्वोत्तम खेळ करण्याची अपेक्षा आहे.

लक्षवेधक ठरलेले खेळाडू

प्रमुख खेळाडूंना अपेक्षापूर्ती करता आलेली नसली, तरी इतर काही फुटबॉलपटू युरो करंडकात लक्षवेधक ठरले आहेत. फ्रान्ससाठी एन्गोलो काँटे महत्त्वपूर्ण ठरला आहे. यजमान जर्मनीचा युवा जमाल मुसियाला याची संघातील अनुभवी खेळाडूंच्या तुलनेत कामगिरी उजवी आहे.

जर्मन संघातर्फे जमालसह निक्लास फ्युलक्रग यांनी प्रत्येकी दोन गोल, तसेच स्लोव्हाकियाचा इव्हान श्रांझ, रुमानियाचा राझवान मारिन, नेदरलँड्सचा कॉडी गाक्पो यांनीही प्रत्येकी दोन गोल केले आहेत. स्पर्धेतील पदार्पणात बाद फेरी गाठलेल्या जॉर्जियाच्या जॉर्जेस मिकाऊताझे याने सर्वाधिक तीन गोल केले असून त्यापैकी दोन वेळा त्याने पेनल्टीवर लक्ष्य साधले.

आकडेवारीत युरो करंडकाची साखळी फेरी

- सर्वाधिक विजय ः स्पेन – ३

- सर्वाधिक बरोबरी ः स्लोव्हेनिया व डेन्मार्क – प्रत्येकी ३

- सर्वाधिक सांघिक गोल ः जर्मनी – ८

- सर्वाधिक वैयक्तिक गोल ः जॉर्जेस मिकाऊताझे (जॉर्जिया) – ३

- सर्वांत जास्त सामने गोल न स्वीकारणे (क्लीन शीट) ः स्पेन – ३

- पेनल्टीवर सर्वाधिक गोल ः जॉर्जिया – २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.