कोरोनाच्या लाटांमधून वाट काढत क्रीडा जगत 2021 मध्ये पुन्हा नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होते. अनेक रखडलेल्या मोठ्या स्पर्धा याच दरम्यान आयोजित केल्या जात होत्या. क्रिकेट जगतातही सर्व सुरळीत करण्याबाबत प्रयत्न सुरु होते. क्रिकेट जगताने कोरोनावर मात करत काही स्पर्धांचे आयोजन देखील केले. इंग्लंडने पहिल्यांदा बायो बबलमध्ये स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करुन एक आदर्श घालून दिला. त्यानंतर बायो बबलमध्ये अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. मात्र कोरोनावर मात करणाऱ्या क्रिकेट जगताला काही वादग्रस्त आणि हादरवणाऱ्या घटनांनी गालबोट लावले.(Setback To Cricket World In 2021)
1) ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रिका बोर्डांमध्ये दौऱ्यावरुन वाद (Cricket Australia Cancels South Africa Tour)
क्रिकेट जगत जरी कोरोनावर मात करुन पुढे जात असले तरी क्रिकेटवरील कोरोनाचे सावट पूर्णपणे हटले नव्हते. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्चमधील आपला दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला.
यामुळे आधीच कठिण परिस्थितीतून जात असलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला ऑस्ट्रेलियाने दौरा रद्द केल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. या दौऱ्याच्या प्रसारण हक्काच्या बाबतीत क्रिकेट साऊथ आफ्रिकेला 15 लाख डॉलरचा फटका बसला. तर दौरा रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेला 20 ते 26 लाख डॉलरचा तोटा झाल्याचे क्रिकेट साऊथ आफ्रिकेने सांगितले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्याचा मोठा फटका बसला. त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचता आले नाही. या दौऱ्यावर ते तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार होते. मात्र दौरा स्थगित केल्याने न्यूझीलंडला भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची संधी मिळाली.
2) आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव (COVID-19 Outbreak in IPL 2021 Bio-Bubble)
बीसीसीआयने युएईमध्ये 2020 ला आयपीएलचा यशस्वी हंगाम आयोजित केला होता. यामुळे कोरोना काळात दोन पेक्षा जास्त संघ असलेली क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित केली जाऊ शकते हा विश्वास निर्माण झाला होता. त्यानंतर बीसीसीआयने 2021 ला भारतात आयपीएलचा हंगाम आयोजित करण्याची योजना आखली. मात्र स्पर्धा अर्ध्यावर आली असताना आयपीएलच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लागण झाली.
त्यामुळे बीसीसीआयला स्पर्धा अर्ध्यावर आली असताना ती स्थगित करावी लागली. ही स्थगित झालेली स्पर्धा बीसीसीआयने नंतर सप्टेंबरमध्ये युएईत पूर्ण करुन घेतली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली.
3) तालिबानने महिलांना खेळण्यास घातली बंदी (Taliban Bans Women’s Sports)
अफगाणिस्तानात सत्ताबदल झाला आणि तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतला. या घटनेचा अफगाणिस्तान क्रिकेटवरही दूरगामी परिणाम झाला. तालिबानने देशात क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण करण्यास बंदी घातली. यात प्रामुख्यांने आयपीएलचा समावेश होता. यावेळी आयपीएलमध्ये इस्लाम विरोधी कंटेट असतो असा दावा करण्यात आला होता.
याचबरोबर तालिबानने अफगाणिस्तानमधील महिलांना खेळात सहभागी होण्यासही बंदी घातल्याचे वृत्त आले. यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भुमिका घेत अफगाणिस्तान बरोबरची ऐतिहासिक पहिला कसोटी सामना रद्द केला. यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानातील महिला आणि पूरुषांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे यासाठी आग्रही आहे. त्यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानातील परिस्थिती सामन्य होत नाही तोपर्यंत अफगाणिस्तानबरोबरचा कसोटी सामना स्थगित करण्यात येत आहे.' असे वक्तव्य प्रसिद्ध केले होते. (Setback To Cricket World In 2021)
4) पाकिस्तान क्रिकेट बोर्डात संकट (Trouble in Pakistan Cricket Board)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (Pakistan Cricket Board) सप्टेंबर 13 मध्ये एक मोठा बदल झाला. पाकिस्तानचे माजी कर्णधार रमिझ राजा हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाले. मात्र तेथूनच पाकिस्तान क्रिकेट संघात वाद समोर आले. रमिझ राजांची नियुक्ती झाल्यानंतर पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक मिसबाह - उल - हकने आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस याने देखील टी 20 वर्ल्डकपच्या आधी एक महिना राजीनामा दिला.
मिसबाहने 'गेल्या अनेक काळापासून मी बायो बबलमध्ये वावरत आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबापासून बराच काळ दूर आहे. त्यामुळेच मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मला माहिती आहे की पद सोडण्याची ही योग्य वेळ नाही. पण, मला असे वाटते की पुढची आव्हाने पेलण्यासाठी मानसिकदृष्या योग्य स्थितीत नाही.' असे वक्तव्य प्रसिद्ध केले होते.
5) वर्णद्वेशने इंग्लंड क्रिकेटचा बुरखा फाडला (Racism in Yorkshire Cricket)
यॉर्कशायर क्रिकेट क्लबचा माजी खेळाडू अझीम रफीक याने इंग्लंडमधील प्रसिद्ध काऊंटी क्रिकेट क्लब यॉर्कशायरमध्ये वर्णद्वेशाची पाळेमुळे खूप खोलवर रुजल्याचा आरोप केला. या वर्णद्वेशामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार अनेक वेळा आल्याचे रफीकने सांगितले. अखेर डिसेंबर 2020 मध्ये रफीकने यॉर्कशायर विरुद्ध वर्णद्वेशाची कायदेशीर तक्रार केली.
यानंतर काऊंटी क्लबने रफीक विरुद्धचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. क्लबने रफीक हा अयोग्य वागणुकीचा शिकार झाल्याचे मान्य केले. त्यांनी याबद्दल अझीम रफीकची माफी देखील मागितली. मात्र रफीक मागे हटला नाही. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्याबद्दल 'त्याने वर्णद्वेशाविरुद्ध बोलण्याचे धाडस दाखवले. त्याने यॉर्कशायबरोबरचा अनुभव त्याने सांगितला.
यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये ब्रिटीश डिजिटल, कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट्स समितीचे चेअरमन खासदार ज्युलियन नाईट यांनी यॉर्कशायरला याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यानंतर क्लबने आपल्या अहवालात रफीक हा वर्णद्वेशी छळवणुकीचा शिकार झाल्याचे मान्य केले. मात्र या अहवालात रफीकच्या 43 आरोपांमधील 7 आरोप मान्य करण्यात आले.
यानंतर रफीकच्या अनेक सहकाऱ्यांनी रफीकबद्दल वर्णद्वेशी टिप्पणी केल्याचे मान्य केले. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यॉर्कशायरला आंतरराष्ट्रीय आणि महत्वाच्या सामन्यांचे आयोजन करण्यावर बंदी घातली. यानंतर यॉर्कशायरचे चेअरमन रॉजर हुटॉन यांना राजीनामा द्यावा लागला. मार्क ऑथर यांनी देखील यॉर्कशायरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. याचबरोबर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉगनचेही या वादात नाव आले. पण, वॉगनने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र अॅशेस मालिकेसाठी वॉगनला बीबीसीचे समालोचक पद सोडावे लागले.
6) टीम पेनचे जुने 'सेक्सटिंग' प्रकरण पुन्हा आले वर (Tim Paine Resignation)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनला अॅशेस मालिकेच्या तोंडावर राजीनामा द्यावा लागला. त्याचे 2017 मधील सेक्सटिंग प्रकरण पुन्हा वर आल्याने टीम पेनने हा निर्णय घेतला. याचबरोबर तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूरही गेला.
टीम पेनने आपल्या महिला सहकाऱ्याला 2017 मध्ये अश्लील संदेश पाठवले होते. हे प्रकरण अॅशेस मालिकेच्या तोंडावर पुन्हा वर आले. यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियावर हे प्रकरण हाताळण्यावरून जोरदार टीका होत होती. टीम पेनवर क्रिकेट ऑस्ट्रेलियावर आधीच कारवाई करायला हवी होती असा या टीकेचा सूर होता. मात्र ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड टीम पेनच्या मागे उभे राहिले.
अखेर एका आठवड्याने टीम पेनने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. याचबरोबर त्याने मानसिक आरोग्यासाठी क्रिकेटपासून अनिश्चित काळापर्यंत ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
7) बीसीसीआयने विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवले (BCCI Removed Virat Kohli as ODI Captain)
2021 हे वर्ष संपता संपता भारतीय क्रिकेटमध्ये वादळ घेऊन आले. डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट बोर्डाने विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवले. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली. विराट कोहलीने टी 20 वर्ल्डकप पूर्वीच टी 20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर जास्त लक्ष देण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.
दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने एका मुलाखतीत निवडसमितीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार नको होते. त्यामुळेच रोहितकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात बीसीसीआयवर मोठी टीका झाली. हे प्रकरण बीसीसीआयने योग्य प्रकारे हाताळले नाही. पहिल्या दोन अधिकृत वक्तव्यात विराट कोहलीचा साधा उल्लेखही नव्हता.
यानंतर सौरभ गांगुली आणि विराट कोहली यांनी परस्पर विरोधी वक्तव्ये करुन या प्रकरणात आगीत तेल ओतण्याचे काम केले.
8) अॅशेसमधील नो बॉल नाट्य (Ashes No-ball Drama)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेला डिसेंबर 2021 मध्ये सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला गाबा आणि ब्रिसबेन कसोटीत मात दिली. त्यानंतर मेलबर्न कसोटीतही इंग्लंडचा एक डाव राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली.
मात्र या मालिकेत नो बॉल नाट्य चांगलेच गाजले. गाबा कसोटीत दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सने तब्बल 14 वेळा ओव्हर स्टेपिंग केले. मात्र फक्त दोन वेळाच नो बॉल देण्यात आला. यातील एका चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर बाद झाला होता.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की गाबा मैदानावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे तिसरे अंपायर पॉल विलसन यांना प्रत्येक चेंडू तपासता येत नव्हता. त्यामुळे नो बॉल देण्याचा निर्णय देण्याचे काम मैदानावरील पंचांकडे सोपवण्यात आले. विलसन हे फक्त विकेट पडली तरच नो बॉल तपासणार होते.
यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. समालोचन करणाऱ्या रिकी पॉटिंगनेही यावर टीकेची झोड उठवली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.