नवी दिल्ली : भारतीय फुटबॉलचा आयकॉन आणि महान खेळाडू सुनील छेत्रीने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कुवेतविरुद्ध ६ जून रोजी होणारा विश्वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील सामना हा छेत्रीचा अखेरचा सामना असणार आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये छेत्री चौथ्या क्रमांकावर आहे.
भारतीय फुटबॉलची गेली अनेक वर्षे अखंडित आणि अविरत सेवा करणाऱ्या छेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या छेत्रीने आत्तापर्यंत ९४ गोल केले आहेत.
३९ वर्षीय छेत्री १९ वर्षे भारतीय संघातून खेळत आहे. विश्वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील कुवेतविरुद्धचा हा सामना कोलकतामधील सॉल्ट लेग स्टेडियमवर होणार आहे. याच मैदानावर तो अनेक सामने खेळलेला आहे. या पात्रता स्पर्धेत भारताचा अ गटात समावेश आहे आणि चार गुणांसह कतारनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
छेत्री मार्च महिन्यात १५०वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. गुवाहाटीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या या सामन्यात छेत्रीने गोल केला, मात्र भारतीय संघाचा १-२ असा पराभव झाला. २००५ मध्ये छेत्रीने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
त्यानंतर त्याचा आलेख उंचावतच गेला आणि बघता बघता तो भारतीय फुटबॉलचा चेहरा बनला. कारकिर्दीच्या उच्च स्तरावर असतानाच आता तो निवृत्त होत आहे. माझ्या देशाकडून मी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळलो तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही, माझ्यासाठी तो अविस्मरणीय प्रसंग होता, अशी भावना छेत्रीने व्यक्त केली.
भारतीय संघाचा पुढचा ‘९’ क्रमांक शोधण्याची वेळ आली आहे. सध्या खेळत असलेल्या अनेक खेळाडूंमध्ये आपल्या क्लबचेही प्रमुख स्ट्रायकर होण्याची क्षमता असलेले खेळाडू दिसत नाही. भारतीय संघासाठीही हीच मोठी उणीव आहे, असे छेत्री भारतीय संघाच्या भवितव्याबाबत म्हणाला. छेत्री आता ११ क्रमांकाची जर्सी परिधान करत असला तरी त्यान ९ या क्रमांकापासून आपल्या क्लब फुटबॉलची सुरुवात केली होती.
१९ वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीही स्वतःचा विचार केला नाही. जो काही बरा-वाईट खेळ केला तो देशासाठी होता, एकीकडे दडपण आणि दुसरीकडे जबाबदारी यांचा संगम साधत देशाच्या फुटबॉलची सेवा केली.
गेल्या दोन- अडीच महिन्यांपासून मी अजून एक सामना... अजून एक सामना असा विचार करून खेळत होतो आणि अखेरीस थांबण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्व आठवणी दाटून आल्या, असे छेत्री म्हणाला.
निवृत्तीचा हा निर्णय मी आई, वडील आणि पत्नीला सांगितला. कारण कुटुंब हे माझ्यासाठी प्राधान्यक्रमाचे आहे. वडिलांनी शांतपणे ऐकून घेतले; परंतु आई आणि पत्नीला अश्रू अनावर झाले, हे सांगताना छेत्रीचेही मन हेलावले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.