पाकिस्तान क्रिकेट संघातील माजी क्रिकेटर सलमान बट्ट याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. सध्याच्या घडीला विराट कोहलीच्या विरोधात 'डर्टी' गेम सुरु असून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा त्याच्यासाठी अग्नी परीक्षा असेल, असे मत सलमान बट्टने मांडले आहे. युएई आणि ओमान येथे रंगणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ अपयशी ठरला तर विराट कोहलीला कर्णधार पद सोडावे लागण्याची भितीही सलमान बट्ट याने व्यक्त केलीये.
कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सर्वोत्तम कामगिरी करत आहे. कसोटीतील यशानंतर वर्ल्ड कपच्या अनुषंगाने विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणे अयोग्य असल्याचेही सलमान बट्टने म्हटले. सलमानने आपल्या युट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात विराट कोहलीचे कर्णधारपद धोक्यात असल्याचे सांगितले. कोणत्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली संघाला अधिक फायदा होईल, हा ज्या त्या क्रिकेट बोर्डाचा प्रश्न असतो. पण टी-20 वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा खेळत असताना कर्णधार पदाची चर्चा करणे योग्य नाही.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाने दमदार कामगिरी केल्याचा उल्लेख सलमानने यावेळी केला. टीम सिलेक्शननंतर विराट कोहलीवर टीका झाली. पण खेळाडूंनी त्याचा विश्वास सार्थ ठरवला. सध्याच्या घडीला भारतीय संघ क्रिकेटच्या सर्वच प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत आहे. वर्ल्ड कप अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना प्रसारमाध्यमांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थिीतीत करण्यात येत आहे. हा विराट विरोधातील 'डर्टी गेम' असल्याचे वाटते, असे प्रामाणिक मत सलमानने व्यक्त केले.
रोहित आणि विराट या दोघांच्या नेतृत्वाची तुलना करताना सलमान म्हणाला की, रोहित उत्तम कर्णधार आहे. पण सध्याची वेळ ही नेतृत्व बदलाची चर्चा करण्यासाठी योग्य नाही. ट्रॉफी जिंकण्याचे निकष वेगवेगळे असतात. त्याचा संबंध जोडून नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जाऊ शकत नाही, असे म्हणत सलमान बट्टने विराट कोहलीला समर्थन दर्शवले आहे.
आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीवर दबाव असेल, अशा चर्चा काही प्रमाणात रंगताना दिसत आहेत. टीम इंडियाला आयसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकून देणाऱ्या महेंद्र सिंग धोनीची जागा घेतल्यानंतर आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सातत्याने अपयश आले आहे. एका बाजूला संघ दमदार कामगिरी करताना दिसतोय. पण दुसरीकडे आयसीसीच्या स्पर्धेत प्लॅन फसला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा, 2019 चा वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा खेळली. या तिन्ही स्पर्धेत भारतीय संघाला अपयश आले होते. यामुळेच टी-20 वर्ल्ड कपसाठी धोनीला मेंटोर म्हणून संघासोबत घेतले आहे. जर भारतीय संघ पुन्हा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत अपयशी झाला तर कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद येऊ शकते, असे बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.