Garry Kasparov : बुद्धिबळातील सिकंदर

सन् १९८६ ते २००५ या कालावधीत बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात एक आख्यायिका बनलेल्या माजी विश्वविजेत्या गॅरी कास्पारोवने आज १३ एप्रिल २०२३ रोजी वयाची साठी ओलांडली आहे.
Garry Kasparov
Garry Kasparovsakal
Updated on
Summary

सन् १९८६ ते २००५ या कालावधीत बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात एक आख्यायिका बनलेल्या माजी विश्वविजेत्या गॅरी कास्पारोवने आज १३ एप्रिल २०२३ रोजी वयाची साठी ओलांडली आहे.

सन् १९८६ ते २००५ या कालावधीत बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात एक आख्यायिका बनलेल्या माजी विश्वविजेत्या गॅरी कास्पारोवने आज १३ एप्रिल २०२३ रोजी वयाची साठी ओलांडली आहे. कोणत्याही खेळातील दिग्गज खेळाडूंची आठवण काढल्यास त्या खेळाडूचा एक जीवनपट क्रीडा रसिकांच्या डोळ्यासमोरून चित्रफिती सारखा तरळून जातो. सन १९८५ मध्ये अवघ्या बाविसाव्या वर्षी रशियाचा ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोव १३ वा विश्वविजेता म्हणून जगासमोर आला. सन १९८६ पासून २००५ मध्ये निवृत्ती घेण्यापर्यंतचा म्हणजे २२८ महिन्यांच्या आपल्या कारकिर्दीच्या कालावधीत कास्पारोव २२५ महिने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहिला.

बुद्धिबळात २८०० फिडे रेटिंगचा टप्पा ओलांडणारा कास्पारोव हा पहिला खेळाडू ठरला. सन १९९९ मध्ये कास्पारोवने २८५१ फिडे रेटिंग ही ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या खेळाडू कडून हा विक्रम मोडण्यासाठी २०१३ साल उजाडले. जसा १९७२ च्या जर्मन ऑलिम्पिक या एकाच स्पर्धेतील ७ सुवर्ण पदकांचा मार्क स्पिट्झ याचा विक्रम अमेरिकेच्या मायकेल फेल्पस् याने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये ८ सुवर्ण पदके प्राप्त करून मोडीत काढला. अगदी याच दिमाखात नॉर्वेचा विश्वविजेता ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याने कास्पारोवचा विक्रम मोडला. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. फेल्पस् याची ७ सुवर्ण पदकाची कामगिरी पाहिल्या नंतर, आठव्या सुवर्ण पदकाच्या कामगिरीच्या वेळेस मार्क स्पिट्झ उपस्थित राहू शकला नाही. खरेतर विक्रम मोडले जाणे म्हणजेच खेळाची प्रगती चालू असल्याचे ते एक परिमाण असते.

आजवरच्या कारकिर्दीत एकूण २८ (पैकी २३ सुवर्ण) ऑलिम्पिक पदके प्राप्त करणाऱ्या मायकेल फेल्पस् याने देखील २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक नंतर निवृत्ती जाहीर केली होती. यावेळी मार्क स्पिट्झ याने म्हटले, " फेल्पस् महाविद्यालयात गेला नसल्याने, तो निवृत्ती घेऊन काय करणार? तो पुन्हा पुनरागमन करेल". आणि असेच झाले. फेल्पस् याने केवळ दोन वर्षात म्हणजे २०१४ मध्ये पुनरागमन केले.

एवढेच नाही तर २०१६ च्या रिओ दि जानेरो ऑलिम्पिक मध्ये ३१ वर्षीय फेल्पस् याने आपल्या कारकिर्दीतील पाचव्या ऑलिम्पिक मध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केले. जसा मनुष्यरूपी फेल्पस् नावाचा देवमासा पाण्या बाहेर गुदमरला, त्याच प्रमाणे बुद्धी सागरातील कास्पारोव देखील बुद्धिसागरा बाहेर अखेर गुदमरला. मात्र बुद्धीसागरात पुन्हा उडी घेण्यापूर्वी, कास्पारोव याने मध्यंतरी स्वतःच स्वतःची घेतलेली चाचणी यशस्वी होऊ शकली नाही. कास्पारोवची तुलना इतर क्रीडा प्रकारातील अनेक दिग्गज खेळाडूं बरोबर होऊ शकेल. अर्थात ती एका लेखात शक्य नाही.

लिनारेस येथे सन २००५ मध्ये निवृत्ती घेताना कास्पारोवने म्हटले होते, "माझ्या निवृत्ती नंतर विश्वनाथन आनंद जागतिक क्रमवारीत अग्रस्थान भूषवेल. (एप्रिल २००७ मध्ये आनंद जागतिक क्रमवारीत प्रथमस्थानी आला. तर मार्च २०११ मध्ये आनंदने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च म्हणजे २८१७ फिडे रेटिंग प्राप्त केले. ) परंतु आनंद नंतर मात्र बुद्धिबळ या खेळावर कार्जाकिन, नाकामुरा, कार्लसन यांच्या सारख्या तरुण प्रतिभाशाली खेळाडूंचेच राज्य येईल." निवृत्ती नंतर कास्पारोवने केलेल्या अशा अनेक भविष्यवाणी देखील खऱ्या ठरल्या.

पूर्वी बलाढ्य बुद्धिबळपटूचे सरासरी वय ३५ होते, तर सध्या १२-१५ व्या वर्षी खेळाडू ग्रँडमास्टर होत आहेत. बुद्धिबळ डावांचे खोलवर विश्लेषण करण्यास सर्वोत्कृष्ट संगणक प्रणाली उपलब्ध असल्यानेच हे शक्य आहे. असे असले तरी सर्वोच्च यश प्राप्ती साठी खेळाडूकडे स्वतःची अशी प्रतिभा असावीच लागते. जसे सध्याच्या फिजिक्सच्या विद्यार्थ्याला आईन्स्टाईन, न्यूटन पेक्षाही अधिक माहिती असू शकते. अर्थात ते आईन्स्टाईन, न्यूटन पेक्षा जास्ती ज्ञानी व प्रतिभावान आहेत असा त्याचा अर्थ होत नाही.

या पार्श्वभूमीवर सांगण्याचा मुद्दा हा की, स्वतःच्या डावांचे विश्लेषण करण्याची कास्पारोवची एक विलक्षण पद्धती होती. डावांचे विश्लेषण करताना तो अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचा देखील खोलवर अभ्यास करत असे. कारण बुद्धिबळामध्ये संशोधनात्मक अभ्यासाला कायम स्वरूपी महत्व असते, याचे उचित भान त्याला होते. बुद्धिबळातील या सिकंदराला आज तमाम बुद्धिबळ चाहत्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा.

(लेखक बुद्धिबळ अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.