Asia Cup 2023 Gautam Gambhir : विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवडताना ठराविक क्रमांकासाठी कोणाला गृहीत धरून त्याची निवड करू नका. अगोदरच्या लौकिकापेक्षा सध्याचा फॉर्म लक्षात घ्या, असे स्पष्ट मत माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.
विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ अगोदर आशिया करंडक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे, पण त्यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर करावा लागणार आहे.
फलंदाजीचा कोणताही क्रमांक कोणासाठी कायम नसतो. विश्वकरंडक जिंकणे महत्त्वाचे असते, असे गंभीरने सांगितले. आशिया करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात के.एल. राहुल, श्रेयस अय्यर यांच्यासह तिलक वर्माला स्थान देण्यात आले. राहुल आणि अय्यर दुखापतीनंतर परतत आहेत; तर तिलक अजून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. अजित आगरकर यांच्या निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्यावरही विश्वास कायम ठेवला आहे.
रोहित शर्माने संघनिवडीच्या पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे कोणीही संघातले स्थान गृहीत धरू नये, याचा पुनरुच्चार करून गंभीर म्हणतो, अय्यर आणि राहुल संघात परतले हे चांगलेच आहे. त्यांना कदाचित अंतिम संघात प्राधान्य मिळू शकते, परंतु तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे फॉर्मात असतील तर अय्यर, राहुल आणि इशान किशन यांच्याऐवजी तिलक, सूर्यकुमार यांना प्राधान्य मिळायला हवे. विश्वकरंडक स्पर्धा चार वर्षांनंतर येते. कोणाचे स्थान गृहीत धरून त्याला पसंती दिली जाऊ नये.
सूर्यकुमार यादवची अशिया करंडक स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल गंभीर यांनी समाधान व्यक्त केले. सूर्यकुमार भले सध्या फॉर्मात नसेल, परंतु तो प्रभाव पाडणारा फलंदाज आहे. त्याचा कसा वापर करायचा यावर संघ व्यवस्थापनाने मार्ग काढायला हवा, असे गंभीरने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. यातून विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम संघात कोण खेळेल हे जवळपास निश्चित होईल. कारण या मालिकेत ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतीय संघही मुख्य खेळाडूंसह खेळणार आहे, असे मत गंभीरने मांडले.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी पहिल्या सात फलंदाजांमध्ये तीन डावखुरे फलंदाज खेळवा, असे मत काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांनी मांडले होते. या थिएरीला गंभीरने कडाडून विरोध दर्शवला. मुळात ही चर्चा निरर्थक आहे. अमुक एवढेच डावखुरे फलंदाज संघात असावेत हे बंधनकारक नाही, असे गंभीरने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.