नवी दिल्ली : गौतम गंभीर यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेली असली तरी सपोर्ट स्टाफची निवड अजूनही करण्यात आलेली नाही; परंतु श्रीलंका दौऱ्यात अभिषेक नायर आणि रायन टेन डॉईश्चे गंभीर यांचे सहायक असणार हे बहुतेक निश्चित आहे.
अभिषेक नायर यांच्यावर फलंदाजीचे प्रशिक्षक तर डॉईश्चे यांच्यावर गोलंदाजीचे प्रशिक्षक ही जबाबदारी असू शकेल. राहुल द्रविड यांच्या टीममधील क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप हे गंभीर यांच्याही टीममध्ये असणार आहेत.
दिलीप यांच्या मार्दर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातच प्रगती केली नाही तर दिलीप यांच्यामुळे ड्रेसिंग रूमधील वातावरण अधिकच सकारात्मक आणि चैतन्यपूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. नवनव्या कल्पना लढवून ते खेळाडूंना सतत प्रोत्साहित करत असतात, त्यामुळे गंभीर यांच्या टीममधील त्याचे स्थान यापुढेही कायम राहील, असे सांगण्यात येते.
अभिषेक नायर आणि टेन डॉईश्चे केवळ श्रीलंका दौऱ्यासाठी हंगामी सपोर्ट स्टाफमधील सहकारी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून डॉईश्चे यांच्यानंतर मॉर्नी मॉर्कल यांची नियुक्ती होण्याची शक्यता अधिक आहे.
आयपीएलमध्ये गंभीर यांच्यासह अभिषेक नायर, डेन डॉईश्चे आणि मॉर्कल यांनी सपोर्ट स्टाफमध्ये काम केलेले आहे. अभिषेक नायर आणि डॉईश्चे हे आयपीएल विजेत्या कोलकता संघातील सहायक प्रशिक्षक आहेत तर गौतम गंभीर लखनौ संघाचे मेंटॉर असताना मॉर्कल त्या संघातील गोलंदाजी प्रशिक्षक होते.
उपलब्ध माहितीनुसार श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघासोबत अभिषेक नायर आणि दिलीप हे प्रवास करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. डॉईश्चे यांच्याबाबत अजूनही स्पष्ट चित्र झालेले नाही. सध्या ते अमेरिकेत सुरू असलेल्या मेजल लीग क्रिकेट स्पर्धेत कोलकता संघाचे सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. त्यामुळे ते कदाचित अमेरिकेतून थेट कोलंबोला प्रवास करण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ कोलंबोसाठी सोमवारी विशेष विमानाने दुपारी एक वाजता प्रयाण करणार आहेत. त्याअगोदर बीसीसीआय गौतम गंभीर यांची पत्रकार परिषद आयोजित करण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत टी-२० चा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि बीसीसीआय सचिव जय शहा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मूळचे मुंबई रणजी संघाचे खेळाडू असलेल्या अभिषेक नायर यांनी येत्या मोसमासाठी तयारी करत असलेल्या मुंबई संघातील ३० ते ३५ खेळाडूंच्या शिबिरात मार्गदर्शन केले. या शिबिरात त्यांनी विशेष करून मानसिक कणखरता, विचारशक्ती आणि खेळाच्या इतर बाबींवर मार्गदर्शन केले. मुंबई संघाचे हे शिबिर बीकेसी येथील बंदिस्त अकादमीत सुरू आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेचे हे शिबिर एका आठवडा चालणार होते; परंतु सध्या मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्यामुळे हे शिबिर लवकर संपवण्यात आले आणि मुंबईचा संघ लगेचच अलूर (कर्नाटक बंगळूर) येथे रवाना झाला. आता तेथे त्यांचे मोसमपूर्व शिबिर होणार आहे. नायरही मुंबई खेळाडूंसह अलूर येथे जाणार होते; परंतु आता भारतीय संघाची जबाबदारी येत असल्यामुळे ते मुंबईतच राहिले आहेत.
मुंबईचा संघ रणजीत गतविजेता आहे. अभिषेक नायर यांचा अनुभव संघातील खेळाडूंसाठी नव्या मोसमास सामोरे जाण्यापूर्वी निश्चितच मोलाचा ठरेल, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.