कुस्ती क्रीडा प्रकारातून ऑलिम्पिकमध्ये पदकाची आस असलेल्या बजरंग पुनियाला स्पर्धेपूर्वी दुखापत झाली आहे. दुखापत झाली असली तरी आता बरे वाटत आहे, असे सांगत त्याने घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. रशियातील स्थानिक स्पर्धेत खेळताना बजरंग पुनियाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झालीये. त्याच्या प्रशिक्षकांनी तो यातून सावरुन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर आता खुद्द बजरंग पुनियाने आपल्या चाहत्यांना मोठा दिलासा दिलाय.
दुखापत खूप गंभीर नसून चालताना त्याला कोणाचाही आधार घेण्याची गरज नसल्याची माहिती समोर येत आहे. किमान दोन दिवस विश्रांतीनंतर तो फिट दिसेल, असेही बोलले जात आहे. रशियातील अली एलिव्ह स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये कुदेव विरुद्धच्या लढतीत बजरंगच्या पायाला दुखापत झाली होती. प्रतिस्पर्धी पैलवानाने पाय ओढल्यानंतर वेदनांनी तळमळत पुनियाने मैदान सोडले होते. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले.
आपल्या दुखापतीसंदर्भात पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुनिया म्हणाला की, मी ठीक आहे. खेळाच्या मैदानात या गोष्टींचा सामना करावाच लागतो. यासंदर्भात त्याने एक ट्विटही केले आहे. सर्वांनी दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल आभारी आहे. मी लवकरच तुम्हाला मॅटवर दिसेन, असा विश्वास बजरंग पुनियाने व्यक्त केलाय. दुूखापतीसंदर्भात त्याने अधिक माहिती देणं टाळलं असले तरी लवकरच परण्याचा विश्वास हा त्याच्या चाहत्यांसह भारतासाठी दिलासा देणारा असाच आहे.
त्याच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालताना त्याला सध्या कोणाच्याही आधाराची गरज भासत नाही. दुखापतीसंदर्भात आताच काही सांगणे चुकीचे ठरेल. 48 तासांतील निरीक्षणानंतर सूज कमी आल्यावरच दुखापतीचा अंदाज लावता येईल. बजरंग पुनियाकडून ऑलिम्पिकमध्ये पदकाची आस आहे. मागील 6 महिन्यांपासून तो कसून सरावही करतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.