दुबई : महान आणि विश्वविक्रमी धावपटू उसेन बोल्ट याची जून महिन्यात होत असलेल्या टी-२० विश्वकरंडकासाठी सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली. आयसीसीकडून बुधवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. वेस्ट इंडीज व अमेरिका येथे १ ते २९ जून या दरम्यान प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
उसेन बोल्ट वेगाचा बादशहा म्हणून ओळखला जातो. त्याने बीजिंग, लंडन आणि रिओ दी जेनेरिया येथील ऑलिंपिकमध्ये विक्रमांसह पदकांवर मोहोर उमटवली. उसेन याने ऑलिंपिकच्या इतिहासात आठ सुवर्णपदकांची माळ आपल्या गळ्यात घालत इतिहास रचला. या पठ्ठ्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही अकरा सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण १४ पदके आपल्या नावावर केली.
उसेन बोल्टच्या नावावर आजही विक्रमांची नोंद आहे. त्याने १०० मीटर धावण्याची शर्यत ९.५८ सेकंदांत पूर्ण करीत नवा विक्रम प्रस्थापित केला होता. तसेच २०० मीटर शर्यत १९.१९ सेकंद अशी वेळ देत पूर्ण केली. शिवाय ४ बाय १०० मीटर शर्यत त्याने नेस्टा कार्टर, मायकेल फ्रेटर व योहान ब्लेक यांच्या साथीने ३६.८४ सेकंद अशी वेळ देत पूर्ण केली. या तीनही शर्यतीत तो विजेता ठरला. या शर्यतींमधील विक्रम आजही अबाधित आहे हे विशेष.
उसेन बोल्ट याचा जन्म वेस्ट इंडीजमधील जमैका बेटावर झाला. आगामी टी-२० विश्वकरंडक तेथेच खेळवण्यात येणार आहे. बोल्टला सदिच्छादूत केल्यामुळे टी-२० विश्वकरंडकाचा प्रसार व प्रचार होण्यास मदत होईल. या हेतूनेच आयसीसीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.